_MPC_DIR_MPU_III

Pimpri: पालिकेने पुरविलेले मास्क निकृष्ट दर्जाचे, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल

Masks provided by the municipality are of inferior quality,Shocking report of the inquiry committee भांडार विभागाच्या गलथान कारभारावार शिक्कामोर्तब ; भांडार विभाग मास्कचे नमुनेच देऊ शकला नाही, आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुरविलेले मास्क निकृष्ट दर्जाचे असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मास्कची रंगसंगती वेगळी, काही मास्क अस्तरशिवाय पुरवठा झाले आहेत. तर, भांडार विभाग मास्क खरेदी गैरव्यहारातील चौकशीसाठी चार संस्थांचे ‘नमुने’च देऊ शकला नसल्याची धक्कादायक माहिती समिती अहवालातून समोर आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

यामुळे भांडार विभागाच्या गलथान कारभारावार शिक्कामोर्तब झाले आहे. आता आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. चौकशी समितीला नमुने देऊ न शकलेल्या भांडार विभागावर आणि विभागाचे प्रमुख मंगेश चितळे यांच्यावर आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महापालिकेने झोपडीधारकांना मास्क वाटप करण्यासाठी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क खरेदी केले आहेत. एक मास्क दहा रुपयांना खरेदी केला. कोरोनाच्या महामारीतही राजकीय पदाधिका-यांनी आपली पोळी भाजून घेतल्याचे आरोप झाले.

महासभेत देखील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मास्कचा दर्जा, किंमत याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली होती. त्या समितीने आपला अहवाल आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सादर केला आहे. त्यात भांडार विभागावर ठपका ठेवण्यात आला आहे.

भोसरीतील 30 हजार मास्क पुरविलेल्या ओम क्रिएटीव्ह टेलर या पुरवठादाराने कमी आकाराचे मास्क पुरविले आहेत. याला आरोग्य वैद्यकीय अधिका-यांची मान्यता घेतली नाही. साई एंटरप्रायजेसने पुरविलेल्या मास्कचा तिसरा नमुना आरोग्य अधिका-यांनी प्रमाणित केला नाही.

तर, गुरुनुर एंटरप्रायजेस यांनी अस्तराशिवाय मास्क पुरविले आहेत. पिंपळेगुरव येथील कुलस्वामिनी महिला बचत गटाने पुरविलेल्या मास्कच्या नमुन्यातील कापड व रंगगसंगती वेगळी असली तरी मूळ नमुन्याशी मिळती जुळती आहे.

_MPC_DIR_MPU_II

तर, दिगंबरा महिला बचत गट, आरंभ महिला बचत गट, आनंद एंटरप्रायजेस व महावीर कॉर्पोरेशन यांच्याकडील आरोग्य वैद्यकीय अधिका-यांनी प्रमाणित केलेले नमुने उपलब्ध आहेत. तथापि, त्यांनी पुरवठा केलेल्या नमुन्यांची पडताळणी करण्यासाठी भांडार विभागाने त्याचे नमुनेच दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

भांडार विभाग या संस्थांनी पुरविलेल्या मास्कचे नमुनेच देऊ शकला नसल्याने ‘इथेच’ माशी शिंकल्याचे स्पष्ट होत आहे. भांडार विभागाचा गलथान कारभार यातून समोर आला आहे. या संस्थाचे नमुने भांडार विभाग का देवू शकला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच पुरवठादारांची नावे देखील चौकशी समितीला उपलब्ध झाली नाहीत.

कमी दर्जाच्या कापडाचे मास्क दिले आहेत. मास्क वापरण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिका-यांचा प्रमाणित केल्याचा दाखला नाही. हिरव्या रंगाचे मास्क मूळ नमुन्याशी मिळते जुळते नाहीत. ते मास्क कोणत्या पुरवठादाराने पुरविले याची माहिती समितीला मिळाली नाही, असे अहवालात म्हटले आहे.

आता भांडार विभागाच्या प्रमुखांवर आयुक्त काय कारवाई करणार

काही संस्थेचे मास्क निकृष्ट दर्जाचे असल्याचे चौकशी समितीतून समोर आले आहे. रंगसंगती वेगळी आहे. तर, धक्कादायक बाब म्हणजे मास्क खरेदी गैरव्यहारातील चौकशीसाठी भांडार विभाग चार संस्थाच्या मास्कचे पुरावेच देवू शकला नाही. त्यामुळे भांडार विभागाच्या गलथान कारभारावार शिक्कामोर्बत झाले आहे.

यामुळे भांडार विभागाचे प्रमुख मंगेश चितळे यांच्यावर आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चितळे यांना पालिकेत तीन वर्ष पूर्ण होत आले असून ते बदलीच्या मार्गावर आहेत. त्यांनी कोरोनाच्या महामारीत ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, चौकशी समितीचा अहवाल काल माझ्याकडे आला आहे. आज मी रजेवर आहे. समितीने काय निष्कर्ष काढला आहे हे अद्याप मला माहिती नाही, असे भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.