Pimpri: महापालिकेडून केंद्र सरकारच्या निकषांची पूर्तता; ‘अमृत’ योजनेसाठी दोन कोटींचे विशेष अनुदान

Municipal Corporation meets Central Government norms; Special grant of Rs. 2 crore for 'Amrut' scheme

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने अमृत अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या दहा निकषांची पूर्तता केली आहे. त्यामुळे पालिकेला दोन कोटी सात लाख 57 हजार रुपयांचे विशेष अनुदान मंजूर झाले आहे.

राज्यातील 44 शहरांपैकी पिंपरी पालिकेला तिस-या क्रमांकाचे सर्वात जास्त अनुदान मिळाले आहे. तर, नवी मुंबई महापालिकेला पहिल्या क्रमांकाचे दोन कोटी 12 लाख तर धुळे पालिकेला दुस-या क्रमांकाचे दोन कोटी 9 लाख रुपये अनुदान मिळाले आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश झाला आहे. केंद्र सरकारकडून या अभियानाअंतर्गत पाणीपुरवठा टप्पा 1, टप्पा 2, मलनि:स्सारण आणि हरित क्षेत्र विकास, बगीचा प्रकल्पांचे काम कार्यान्वित आहे.

अमृत अभियानांतर्गत सुधारणांची पूर्तता करणा-या राज्यांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करण्यात येते.

राज्य सरकारने 2015-16, 2016-17, 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये अमृत अभियानांतर्गत आवश्यक असलेल्या सुधारणांची पूर्तता केली आहे. त्यामुळे मंजूर केलेल्या प्रोत्साहन अनुदानापैकी 40 टक्के अनुदान अमृत शहरांना यापूर्वीच देण्यात आले आहे. 2 जानेवारी 2019 रोजी महापालिकेला एक कोटी 37 लाख 59 हजार 552 रुपये अनुदान मिळाले आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या सुधारणांच्या यादीनुसार पिंपरी महापालिकेने गेल्या चार वर्षात ई-गव्हर्नन्स, महापालिका संवर्गाबाबत घटना व व्यावसायिकता, द्विनोंद लेखा पद्धतीचा अवलंब करणे, नागरी नियोजन आणि शहर पातळीवर योजना, बांधकाम उपविधी आढावा, पालिका कर आणि शुल्क सुधारणा, वापरानुसार शुल्क आकारणी करणे.

वसुली करणेकामी सुधारणा करणे, पतदर्शन मुल्यांकन, ऊर्जा आणि पाण्याचे लेखापरिक्षण व स्वच्छ भारत अभियान अशा 10 निकषांची पुर्तता केली आहे.

त्यामुळे राज्य सरकारकडे जमा असलेल्या उर्वरित अनुदानापैकी अमृत सुधारणांच्या पूर्ततेमुळे पिंपरी महापालिकेला दोन कोटी सात लाख 57 हजार 914 रुपये अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान मंजूर झाले आहे. राज्यातील तिस-या क्रमांचे अनुदान पिंपरी पालिकेला मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.