Pimpri : महापालिकेने प्रभागनिहाय ‘कोरोना शोध केंद्र’ सुरु करावीत -बाबू नायर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. आजपर्यंत शहरातील तब्बल 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यासाठी महापालिकेने अधिक प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. शहरातील 32 प्रभागात कोरोना शोध केंद्र सुरु करावीत. मोबाइल अॅम्ब्युलन्सचा वापर करून झोपडपट्ट्यांमध्ये रोजची वैद्यकीय शिबिरे व शोध शिबिरे घ्यावीत, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस, नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, शहरात कोरोनाचा धोका वाढत आहे. मागील आठ दिवसांपासून दररोज नवीन रुग्ण पॉझिटीव्ह येत आहे. त्यासाठी महापालिकेने अधिक सक्षम उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्वरित किमान 32 प्रभागनिहाय कोरोना शोध केंद्र सुरु करावीत. शोध केंद्रासाठी क्लिनिकसह सर्व खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांची मदत घ्यावी. त्यांना सर्व आवश्यक उपकरणे महापालिकेने पुरवावित.

मोबाइल अॅम्ब्युलन्सचा वापर करून झोपडपट्ट्यांमध्ये रोजची वैद्यकीय शिबिरे आणि शोध शिबिरे घ्यावीत. सर्व झोपडपट्ट्यांमध्ये आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागात सॅनिटायझर्स आणि साबणांचा साप्ताहिक आधारावर नि: शुल्क पुरवठा करण्यात यावा. झोपडपट्टीवासीय, मध्यवर्गीय भागातील नागरिकांना सामाजिक अंतराचे महत्त्व समजावून सांगावे. बहुतेक ठिकाणी त्याचे पालन केले जात नाही.

शहरातील पत्रकार, वकील, सनदी लेखाकार, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती आणि समाजातील इतर सर्व घटकांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधावा. कोरोनाविरूद्धच्या या लढाईत त्यांच्या सूचना घ्याव्यात. त्यांचा सहभाग घेण्यात यावा. वायसीएमसह महापालिकेची सर्व रुग्णालये स्वच्छतागृहांची चांगली देखभाल ठेवावी. शहरात औषधांची फवारणी नियमित करावी. सतत फॉगिंग व रसायनांची फवारणी नियमित करावी. तसेच प्रशासनाने आजपर्यंत केलेल्या उपाययोजनांना आमचा पाठिंबा आहे, असेही नगरसेवक नायर यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.