Pune : पावसाळी कामे तातडीने सुरू करा : दीपाली धुमाळ

महापालिका आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – सध्या महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोनाचा मुकबला करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, पावसाळी कामांकडे दुर्लक्ष होत आहे. साधारण एप्रिल आणि मे महिन्यांत ही कामे करण्यात येतात. जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. त्यापूर्वी पावसाळी गटारांची कामे मार्गी लावण्यात यावी,  अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. दांडेकर पूल, सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक नागरिकांनाच बळीही गेला होता. पावसाचा काहीही भरवसा नाही. तो कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडतो. पुणे महापालिकेत समाविष्ट 11 गावांत पावसाळी गटारे नाहीत. या भागातील ओढे – नाले स्वच्छ करून पावसाळी पाणी कुठेही अडणार नाही, याची काळजी घ्यावी.

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पुणेकरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात रोगराई आणखी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी तातडीने शहरातील नालेसफाई करण्यात यावी, असेही दीपाली धुमाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

पुणे महापालिकेचा 2020 – 21 चा अर्थसंकल्प दिनांक 1 एप्रिल पासून लागू झाला आहे. अर्थसंकल्पातील कामे दिनांक 31 मार्च पर्यंत पूर्ण करून खर्च होणे गरजेचे आहे. तथापि, सन 2020 – 21 साठी अद्यापही दरपत्रक प्रसिद्ध झाले नाही. हे दरपत्रक प्रसिद्ध होण्यास विलंब होत आहे.

त्यामुळे तूर्तास क्षेत्रीय कार्यालयाकडील रक्कम 10 लाख रुपये पर्यंतच्या कामासाठी सन 2019 – 20 चे दरपत्रकाप्रमाणे पूर्वगनपत्रक तायर करणे व निविदा प्रक्रिया राबविण्यास क्षेत्रीय कार्यालयाकडील महापालिका सहाय्यक आयुक्त यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही  धुमाळ यांनी महापालिका आयुक्त  गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.