Pimpri News : महापालिकेवर प्रशासक नेमा, स्थायीतील इतर सदस्यांनी कारवाईबाबत खुलासा करावा – सचिन साठे

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केलेली कारवाई ही शहराच्या नावलौकिकास काळीमा फासणारी घटना आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. प्रदेश भाजपाने व स्थानिक भाजपा पदाधिका-यांनी या धोरणाचे पाईक आहोत हे सिध्द करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे. तसेच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.

भाजपच्या अखत्यारीत असणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून संगनमताने भ्रष्टाचार करीत आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. बुधवारी (दि. 18)  महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षांच्या दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी कारवाई करुन अध्यक्षांसह इतर चार कर्मचा-यांना अटक केली.

एवढी मोठी कारवाई पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच झाली आहे. या प्रकरणाबाबत स्थायी समितीतील इतर पक्षीय सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर खुलासा करुन नागरीकांना अवगत करावे.

जनतेच्या कर रुपी पैशांची ही लूट आहे. महापालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांपासून उच्चपदस्थ अधिका-यांपर्यंत सर्वांचाच भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे दिसते. राज्य सरकारने महापालिकेवर प्रशासक नियुक्त करुन मागील चाडेचार वर्षातील आर्थिक उलाढालीची निपक्षपणे चौकशी करावी, अशीही मागणी शहराध्यक्ष साठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.