Pimpri News: वाचकांना बौद्धिक मेजवानी देणारा ‘अंतरंग’ दिवाळी अंक –  सुरेश कंक

एमपीसी न्यूज – माणसाचे मन, बुद्धी आणि आत्मा आनंददायी करण्याचे काम पुस्तक करीत असते. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एमपीसी न्यूजच्या वतीने पिंपरी चिंचवड अंतरंग प्रतिवर्षी वाचकांच्या भेटीला येत आहे. संपादक विवेक इनामदार, हृषीकेश तपशाळकर, सहयोगी संपादक अनिल कातळे, निमंत्रित संपादक श्रीकांत चौगुले, सहसंपादक स्मिता जोशी यांच्या अथक प्रयत्नांतून वाचकांना साहित्य फराळ म्हणून ‘पिंपरी चिंचवड अंतरंग’ लक्षवेधी ठरला आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संवर्धन समिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुरेश कंक यांनी व्यक्त केले.

डॉ रामचंद्र देखणे यांच्या अमोघ लेखणीतून साकारलेले  ‘लोकवाणीतील विठ्ठल’ प्रवीण दवणे यांनी  आईने मुलाला लिहिलेले भावस्पर्शी पत्र, ज्येष्ठ विचारवंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘महर्षी कर्मवीर वि.रा.शिंदे’ यांची अनुकरण करावी अशी दिलेली माहिती,  डॉ.श्रीपाल सबनीस यांनी छत्रपती शिवरायांची माऊली जिजाबाई यावर लिहिलेले अभ्यासपूर्ण लेखन, ह.भ.प.किसनमहाराज चौधरी संत एकनाथ महाराज यांच्या एका अभंगाने जीवन जगण्याची नवप्रेरणा कशी मिळते ते केलेले वर्णन मंत्रमुग्ध करणारे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. शकुंतला काळे यांनी बोलीभाषेतील म्हणींचा लिहिलेला सुंदर लेख, ग्रंथवाचन हा आत्मचैतन्य जागविण्याचा ज्ञानमार्ग असे सांगत डॉ.यशवंत पाटणे यांनी लिहिलेला  ‘ज्ञान संस्कृतीचे खरे उपासक हा चिंतन लेख, प्रा.कमल पाटील यांनी ‘संत बहिणाई’ यांच्या कवितांचे केलेले रसग्रहण, डॉ.रवींद्र घांगुर्डे यांनी वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सांगितलेल्या आठवणी, पुरुषोत्तम सदाफुले यांनी झाडांचे महत्व सांगितले आहे, असे कंक म्हणाले.

अनिशा फणसळकर, संदीप तापकीर, रघुनाथ पाटील, मधू जोशी, फुलवती जगताप, प्रदीप गांधलीकर, राज अहेरराव, डॉ.नंदकिशोर कपोते,  डॉ. दिलीप गरुड आणि अनेक सकस लिहिणाऱ्या लेखकांनी भरभरून लिहिले आहे. कवितेची सुंदर बाग या दिवाळी अंकात फुलली आहे. करंज्या, लाडू, शेव, चकली, शंकरपाळी असा उत्तम साहित्यलेखन फराळ आम्हा वाचकांना मिळाला आहे. पिंपरी चिंचवड अंतरंगात ज्यांनी लिहिले त्या सर्व कवी लेखकांचे कौतुक वाटले, असे कंक यांनी नमूद केले.

‘शब्दे धन वाटू जनलोका’ असा निर्धार करून पिंपरी चिंचवड अंतरंग अतिशय सुबक मांडणीसह आणि देवदत्त कशाळीकर, प्राजक्ता जोशी यांनी सजवलेल्या मुखपृष्ठासह वाचकांच्या भेटीला आला आहे.संग्रही ठेवावा असाच हा अंक झाला आहे, असे कंक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.