Pimpri News: सहाय्यक आयुक्तांना बेकायदेशीररित्या उपायुक्तपदी बढती – तुषार हिंगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील सहाय्यक आयुक्तांना बेकायदेशीररित्या उपायुक्तपदी पदोन्नती दिल्याचा आरोप करत ती रद्द करण्याची मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात हिंगे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन आकृतीबंधाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये नव्याने निर्माण झालेल्या 8 उपायुक्त पदांपैकी 4 पदांवर महापालिकेच्या चार सहायक आयुक्तांना आपल्या अधिकारात थेट शासनाची मान्यता घेऊन समावेशनाने नियमित नियुक्ती केलेली आहे. ही बाब बेकायदेशीर असून आपण आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

थेट शासन मान्यता घेऊन अशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर व संदीप खोत या चार सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त केले आहे. पदोन्नतीवर नियुक्ती करताना आपण त्यांचे ग्रेड पे देखील बदलले असून, असा महापालिका अधिनियमामध्ये अधिकार नसतानाही आपण केलेले हे गैरकृत्य फौजदारी कारवाईस पात्र ठरते, असे हिंगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.