Pimpri News : प्राधिकरणाबाबत भाजपने केलेले आरोप बिनबुडाचे – योगेश बहल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे ‘पीएमआरडीए’मध्ये विलिनीकरण करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा फायदाच होणार असून भाजपच्या काही नेत्यांचा प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून त्याच जागा लाटण्याचा आणि स्वत:ची खळगी भरण्याच्या प्रयत्नावर पाणी फेरले गेल्याने ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. तथ्यहिन आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना शहरातील जनता ओळखून असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी केले.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे ‘पीएमआरडीए’मध्ये विलिनीकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने दोन दिवसांपूर्वी निर्णय घेतला. यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करत तोंडसुख घेतले होते. संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना दमडीही मिळाली नाही. त्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव सरकारचा असून, त्यातून मिळणारा पैसा बारामतीला जाणार आहे का ? असा प्रश्न सत्ताधारी भाजपकडून उपस्थित केला होता. त्याला योगेश बहल यांनी आज (शनिवारी) निवेदन जारी करून उत्तर दिले आहे.

योगेश बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र हे 1856.90 हेक्टर आहे. विकसीत झालेले 1633 हेक्टर इतके क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरीत होणार असून केवळ 223 हेक्टर क्षेत्र हे ‘पीएमआरडीए’कडे जाणार आहे. त्यामुळे भाजपाचे नेते कोणताही अभ्यास न करता केवळ आरोप करत सुटले आहेत. जे क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरीत झाले आहे त्या ठिकाणी बांधकाम परवाना महापालिका देणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे प्राधिकरण विसर्जित करण्याचा निर्णय तात्कालीन भाजपा सरकारने तीन वर्षांपूर्वीच घेतला होता. काही कारणामुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यावेळी मात्र राज्य सरकारने घेतलेला निर्णय किती योग्य आहे त्याचे गोडवे गाणारे आता विरोध करत आहेत. म्हणजेच केवळ राजकीय हेतूने प्रेरित हे आरोप सुरू आहेत. जे लोक राजकीय जिवनात अजित पवारांच्या जिवावर मोठे झाले तेच आता आरोप करत आहेत. सध्या केवळ शासन निर्णय झालेला आहे. विलिनिकरणाची प्रक्रिया पुढील सहा महिने चालू राहणार आहे.

साडेबारा टक्के परतावा मिळणार
पिंपरी-चिंचवड नगनगर विकास प्राधिकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या त्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला होता. अनेक शेतकऱ्यांना परतावादेखील मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही त्यांना परतावा देण्यास महाविकास आघाडी सरकार बांधिल आहे. असे बहल यांनी नमूद केले.

जशास तसेच उत्तर देऊ
महापालिकेमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनी भ्रष्ट कारभार करत सर्वसामान्य जनतेच्या पैशांची लूट चालविली आहे. मयताच्या टाळूवरील मलिदा खाणाऱ्या ठेकेदारांची बाजू घेणारे पक्षनेते नामदेव ढाके अजितदादांवर टीका करतात यापेक्षा दुसरे दुर्देव काय असू शकते. ज्या लोकांच्या हाती शहरातील जनतेने विश्वासाने सत्ता दिली त्यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला. स्वत:चे पाप लपविण्यासाठी आमच्या नेत्यांवर यापुढे आरोप केल्यास जशास तसेच उत्तर दिले जाईल. असा इशाराही बहल यांनी या पत्राद्वारे दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.