Pimpri News: प्रभाग रचना कशीही करु द्या, 2022 मध्येही भाजपचाच महापौर – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपला काडीचाही फरक पडणार नाही. प्रभाग रचना कशीही करु द्या, त्याचाही काही परिणाम होणार नाही. आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. 2022 मध्येही पिंपरी-चिंचवड शहराचा महापौर भाजपचाच होईल, असा दावा भाजप शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केला.

आमदार लांडगे यांनी आज (बुधवारी) आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. आमदार महेश लांडगे म्हणाले, प्रभाग रचना जाहीर झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल. भोसरीतील भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाईल असे वाटत नाही. गेलाच तर त्याजागी सक्षम उमेदवार तयार आहेत. प्रभाग दोनचा करु द्या, तीनचा करु द्या, प्रभाग कसेही फोडू द्या. त्याचा भाजपला काहीही परिणाम होणार नाही. नगरसेवकांची संख्या सांगणार नाही. पण, आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. 2022 मध्येही भाजपचाच महापौर होईल.

भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. पण, त्याचे पुरावे कुठे आहेत. विरोधकांनी पुरावे द्यावेत. मोघम आरोप करु नये असे सांगत आमदार लांडगे पुढे म्हणाले, मी कोणावर वैयक्तीक टीका केली नाही आणि करणार ही नाही. राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांच्याकडून शहरातील प्रश्नांबाबत दररोज होणा-या टि्वटबाबत विचारले असता ते म्हणाले, शहरातील कोणत्यातरी नेत्याने त्यांना सांगितले असेल. त्यामुळे ते टि्वट करत असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.