Pimpri News: पालिकेच्या शिष्यवृत्ती अर्जातील अटी-शर्तीत बदल करा – अश्विनी चिंचवडे

हे अर्ज विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत. : Change the terms and conditions of the scholarship application of the municipality - Ashwini Chinchwade

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेच्या 2020-21 मधील दहावी व बारावीच्या शिष्यवृत्ती अर्जामध्ये त्रुटी, चुका असल्याने ते अर्ज रद्द करावे लागले. त्याचा विद्यार्थी, पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यातील प्रवेश घेतलेल्या महाविद्यालय प्रमुखांची शिफारस आणण्याची जाचक अट रद्द करण्याची आवश्यकता आहे. त्याऐवजी विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या  शाळेतील मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असा बदल करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे.

जेणेकरुन विद्यार्थ्यांना लवकर कागदपत्रांची  पूर्तता करून अर्ज पालिकेकडे जमा करता येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका चिंचवडे पाटील यांनी म्हटले आहे की, पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या “इतर कल्याणकारी योजना 2020-21 करिता दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज पालिकेकडून देण्यात आले होते.

त्या अर्जामध्ये अनेक त्रुटी, चुका आढळल्याने ते अर्ज रद्द करावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांना, पालकांना आणि लोकप्रतिनिधींना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला आहे.

दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेतलेल्या शिक्षणसंस्था, महाविद्यालयाच्या प्रमुखांची शिफारस आणण्याची जाचक अट टाकली आहे.

नवीन शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यास खूप उशीर होतो.

त्याऐवजी दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या शाळा, महाविद्यालयाच्या प्राचार्यांची सही शिक्का असा बदल करावा. हे अर्ज विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत, असे चिंचवडे यांनी म्हटले आहे.

तसेच अशा ढिसाळ कारभाराबद्दल जबाबदार अधिका-यांना कडक समज द्यावी.  भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी आपण स्वत:  नागरवस्ती विभागाच्या कामाचा आढावा घ्यावा असेही चिंचवडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.