Pimpri News: चिंचवडे यांच्या मृत्यूचे सत्तेसाठी राजकारण करणे हा अत्यंत दुर्देवी प्रकार, स्वत:चे पाप झाकण्यासाठी भाजपकडून खटाटोप; राष्ट्रवादीकडून उत्तर

 एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावरील एका कष्टाळू आणि सामाजिक भान असलेल्या राजकीय व्यक्तीमत्त्वाचे दुख:द निधन झालेले असतानाच तसेच त्यांचा अंत्यविधी होण्याच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाने स्वत:चे पाप झाकण्यासाठी त्यांच्या मृत्यूचे राजकारण करणे हा अत्यंत दुर्देवी प्रकार आहे. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासाठी राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता अथवा महाविकास आघाडी सरकारमधील कोणाचाही संबंध नसल्याचे उत्तर राष्ट्रवादीचे माजी महापौर व नगरसेवक योगेश बहल यांनी दिले

.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यानंतर सायंकाळी पत्रकार परिषदेत भाजपाचे माजी खासदार अमर साबळे, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके व भाजपाच्या इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेत चिंचवडे यांच्या मृत्यूस महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या आरोपाबाबत खेद व्यक्त करत योगेश बहल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.

योगेश बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गजानन चिंचवडे हे सामाजिक क्षेत्राची भान असलेले व सर्वसमान्यांच्या सुख- दुखा:त नेहमीच सहभागी होणारे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाचे दुख: सर्वांनाच झाले आहे. त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो जमिनीच्या वादातून झाला होता. त्याच्याशी राष्ट्रवादीचा अथवा महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. चिंचवडे यांचे निधन होऊन काही तासही उलटले नाहीत, तोच भाजपाने या प्रकरणाचे राजकारण करणे ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. चिंचवडे कुटूंबिय हे भाजपामध्ये काही महिन्यांपूर्वीच आले होते. दुख:च्या या क्षणी त्यांच्या कुटूंबियांना सावरणे, आधार देणे गरजेचे असताना केवळ राजकारण करणे आणि आपले पाप झाकण्यासाठी भाजपाने पत्रकार परिषद घेऊन जे आरोप केले त्याचा आम्ही निषेध करतो.

भाजपाची मंडळी निव्वळ तथ्यहिन आरोप करत आहेत. सत्ता आणि राजकारण हे नेहमीच सुरू असते. मात्र, दुख:द प्रसंगी भाजपाच्या नेत्यांनी घाणेरडे राजकारण न करता चिंचवडे कुटूंबियांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असताना नको ते उद्योग करू नयेत तसेच नाहक राष्ट्रवादीची व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करू नये. गजानन चिंचवडे यांचे निधन ही मनाला वेदना देणारी घटना असून या प्रसंगी चिंचवडे कुटूंबियांच्या पाठिशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे बहल यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.