Pimpri News: महापालिका निवडणुकीबाबत संभ्रमावस्था; शहरातील राजकीय वातावरणही ‘गारठले’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेत झाली असती तर आज आचारसंहिता लागू झालेली असती. परंतु, कोरोनाची तिसरी लाट, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा यामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेली. महापालिकेची निवडणूक 13 मार्चच्या अगोदर होईल का? प्रशासक नेमणार? सहा महिने निवडणुका पुढे जाणार याबाबतचे कोणतेही चित्र स्पष्ट होत नाही.

त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकही शांत झाले असून सर्व कार्यक्रम थांबले आहेत. मतदारांसाठीचे देवदर्शन, सहली, पार्ट्या थांबल्या असून हवेतील गारव्याबरोबर शहरातील राजकीय वातावरणही गारठलेलेच आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विद्यमान सभागृहाचा कालावधी 13 मार्च 2022 रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झाल्यास महापालिकेवर प्रशासक राज येण्याची शक्यता आहे. मागीलवेळी महापालिका निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान झाले होते. त्यासाठी प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास 23 सप्टेंबर 2016 रोजी राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली होती. 2017 च्या निवडणुकीचा निकाल 23 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता. 13 मार्च रोजी महापालिकेत नवीन कारभारी विराजमान झाले होते. परंतु, यावेळी जानेवारी महिना संपत आला. तरी, प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडाही जाहीर झालेला नाही. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत आगामी निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेला सुमारे अडीच ते तीन महिने उशीर झाला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेची निवडणूक वेळेत होईल हे अपेक्षित धरुन विद्यमानांसह इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली होती. आखाड पार्ट्यांपासून राजकीय हालचाली सुरु झाल्या होत्या. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, विविध सार्वजनिक कार्यक्रमांचा प्रभागांमध्ये धडाका लावला होता. वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात होते. सहली, पार्ट्या सुरु झाल्या होत्या. राजकीय हालचाली वाढल्या होत्या. इच्छुक जोरदार तयारी करत होते.

दरम्यानच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न पुढे आला. आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत अशी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेतली. त्याचा तिढा सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट आली. जानेवारी महिना संपत आला तरी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडाही जाहीर झाला नाही. एकूणच महापालिका निवडणुकीबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.

महापालिकेची निवडणूक 13 मार्चच्या अगोदर होणार का, प्रशासक नेमणार, सहा निवडणुका पुढे जाणार? याबाबत कोणतेही चित्र तुर्तास स्पष्ट होत नाही. त्यामुळे सुरुवातीला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राबिवले जाणारे वेगवेगळे उपक्रम, देवदर्शन, सहली सर्वच थांबले आहे. निवडणूक आणखी काही महिने लांबली तर खर्च कशाला करायचा हा विचार करुन विद्यमानांसह इच्छुकांनी सर्व कार्यक्रम थांबविले आहेत. त्यामुळे हवेतील गारठ्याबरोबरच राजकीय वातावरणातही गारठा निर्माण झाले आहे. प्रभाग रचना कधी जाहीर होईल, ओबीसी आरक्षणासह की आरक्षणाविना निवडणूक होईल, निवडणूक कधी जाहीर होईल, आचारसंहिता कधीपासून होईल याकडे विद्यमान नगरसेवकांसह सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.