Talegaon Dabhade News : रेल्वे स्थानकावरील फलकावर तळेगाव दाभाडे नावाचा नामविस्तार करा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावरील फलकावर तळेगाव असा शहराच्या नावाचा उल्लेख करून तो दुरुस्त करत ‘तळेगाव दाभाडे’ असा पूर्ण नावाचा उल्लेख करावा, अशी मागणी जागरूक वाचक कट्टाकडून करण्यात आली आहे. जागरूक वाचक कट्टाच्या वतीने तळेगाव दाभाडे रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगांव दाभाडे रेल्वे स्थानक हे मुंबई पुणे लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे.
या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे. श्रीमंत सरदार सरसेनापती उमाबाई दाभाडे आणि श्रीमंत सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झाले आहे. त्यांच्याच नावावरून या शहराचे नाव तळेगाव दाभाडे असे पडले आहे.

गेली अनेक वर्षे या स्थानकावर तळेगांव या नावाने फलक आहे. सर्व शासकीय व्यवहारात तळेगांव दाभाडे असा शब्दप्रयोग होत असताना शहराचा अर्धवट नावाने उल्लेख होतो तो चुकीचा आहे. शहराला असलेला ऐतिहासिक वारसा पाहता जुने फलक दुरुस्ती करून नवीन पूर्ण नाव तळेगांव दाभाडे. असा फलक लावून शहराला व रेल्वेखात्याला अभिमान वाटेल अशी कार्यवाही व्हावी अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

अर्जाचा सकारात्मक विचार करून आपण या रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन तळेगाव दाभाडे असे करावे आणि नामफलकामध्ये योग्य तो बदल करावा असे स्पष्टपणे म्हटले आहे.

निवेदनावर वाचक कट्टयाच्यावतीने उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, सहसचिव अमित प्रभावळकर यांच्या स्वाक्षरी असून निवेदनाच्या प्रती रेल्वे प्रबंधक पुणे, केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्यमंत्री, रेल्वे प्रबंधक पश्चिम रेल्वे आदींना देण्यात आलेल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.