Pimpri News: कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आहे पण लक्षणे असलेल्या रुग्णांनाही मिळणार उपचार

एमपीसी न्यूज – कोरोना संशयित किंवा निगेटिव्ह अहवाल आलेल्या, परंतु लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला जात होता. परिणामी, असे काही रुग्ण उपचाराअभावी दगावले किंवा ते ‘सुपर स्प्रेडर’ झाले. आता अशा रुग्णांना कुठलीही सबब न देता उपचारासाठी दाखल करुन घेण्याचा आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे, तसेच रुग्णाला दाखल करून घेण्याबाबत अनेक अटी शिथिल केल्या आहेत.

राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊननंतर सरासरी दोन हजार रुग्ण आढळत आहेत. राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सरासरी 22 टक्के असून, पुणे, मुंबईचा दर सरासरी दहा टक्क्यांवर आला आहे. कोरोना नियंत्रणासाठी केंद्राने रुग्णांवरील उपचारांबाबत अनेक अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल टळण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच रुग्णांच्या उपचाराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून झालेली कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ही त्रिस्तरीय रचना कायम आहे. केंद्राने आता रुग्णांवरील उपचारासाठी पॉझिटिव्ह टेस्टचे बंधन काढले आहे. रुग्णाच्या स्थितीनुसार त्याला उपचारासाठी दाखल करून घेणे बंधनकारक केले आहे.

अशा रुग्णांवरील उपचाराबाबत नकार देऊ नये. त्याला औषधे, ऑक्सिज इतर सोयी सुविधा पुरविणे बंधनकारक आहे, तसेच रुग्ण कुठलाही जिल्हा, शहरातील असला तरी त्याला आहे त्या ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेणे अनिवार्य आहे. या संद रुग्णाकडे आधार कार्ड, वैध ओळखपत्र असो की नसो त्याला उपचार नाकारू नये, असे निर्देश केंद्राने दिले आहेत.

याबाबत बोलताना महापालिकेचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “लॉकडाऊननंतर पुन्हा गर्दी, विवाहसोहळे, साखरपुडे अशी कोरोनाला निमंत्रण देणारी पावले पडली. तर, तिसऱ्या लाटेपासून आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही. त्यात लसीकरण महत्त्वाचे आहे. या मोहिमेचा वेग वाढवावा लागणार आहे. चाचण्यांची क्षमता आणि संख्या वाढवावी लागणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.