Pimpri News: रिक्षाचालक मालकांचे कर्ज माफ करा अन्यथा आत्महत्या वाढतील : बाबा कांबळे

पिंपरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षासह मोर्चा काढत तीव्र आंदोलन

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे गेल्या 14 महिन्यापासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक अडचणींमध्ये आलेल्या रिक्षाचालक मालकांनी महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आत्महत्या केल्या आहेत. रिक्षाचे हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीच्या वतीने वसुलीसाठी बेकायदेशीर मार्गाने तगादा लावला जात असून बेकायदेशीर मार्गाने रिक्षा ओढून नेल्या जात असल्याचा आरोप कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केला. रिक्षाचालक मालकांचे कर्ज माफ पाहिजे अन्यथा आत्महत्या वाढतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

याबाबत पोलिसांकडे तसेच जिल्हाधिकारी आणि शासनाकडे सतत पाठपुरावा केला. परंतु, तक्रार देखील दाखल करून घेतली जात नाही. नेमकी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला असून या सर्व परिस्थितीमुळे हतबल झालेल्या रिक्षाचालकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, पिंपरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढून फायनान्स कंपन्या विरोधामध्ये कारवाई करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन केले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी-चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार, उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धनंजय कुदळे, उपाध्यक्ष विजय ढगारे, जाफर शेख, अनिल शिरसाठ, हिरामण गवारे, संजय दौंडकर ,निखिल येवले ,तुषार लोंढे, अजय साळवे ,अभिजीत जाधव ,सोमनाथ आवारे, शिवाजी तापकीर, शहानुर इनामदार, श्याम इंगवले, नबिल शेख, अशोक रवींद्र लंके आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये दहापेक्षा अधिक रिक्षा चालक मालकांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जाला कंटाळून आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर सरकारने उशिरा का होईना परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. त्यांचा सातबारा कोरा केला. याच धर्तीवर रिक्षाचालकांचे कर्ज माफ करून त्यांचे आरसी बुक देखील पूर्ण कोरे होणे आवश्यक आहे. अन्यथा महाराष्ट्रमध्ये रिक्षाचालक मालकांच्या आत्महत्या वाढतील. रिक्षाचालक मालकांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे”.

“रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा सरकारने अनेक वेळा केली परंतु अजूनही कल्याणकारी महामंडळ स्थापन झाले नाही. ” रिक्षाचालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन झाले असते तरी आज याच मंडळामधून रिक्षाचालकांना आर्थिक लाभ मिळाला असता. रिक्षाचालकांचे आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनामध्ये कॅब, टेम्पो, बस, ट्रक, डंपर व इतर वाहतूकदारांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावे, आणि वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे आंदोलन उभे करावे” असे आवाहन कांबळे यांनी केले.

रिक्षाचालकांच्या मागण्या!

# शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालक मालकांचे आरसी बुक कोरे केले पाहिजे रिक्षाचालकांचे कर्ज माफ झालेच पाहिजे.

# सर्वोच्च न्यायालयाचा मनाई हुकूम असतानादेखील फायनान्स कंपनी कडून थकित हप्त्यासाठी रिक्षा ओढून नेल्या जात आहेत. रिक्षावडून नेणाऱ्या फायनान्स कंपनी वरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे.

# रिक्षाचालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून रिक्षाचालकांना तातडीने प्रत्येकी महिना दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळालीच पाहिजे.

# रिक्षाचालक फेरीवाले बांधकाम मजूर असंघटित कामगार कष्टकऱ्यांसाठी टास्क फोर्स स्थापन करून त्यांचे नेमके प्रश्न समस्या सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.