Pimpri News: महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर झाली सुनावणी; अभिप्राय 2 मार्चला पाठविणार निवडणूक आयोगाला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आलेल्या हरकती व सुचनांवर आज (शुक्रवारी) दिवसभर सुनावणी झाली. चिंचवड येथील अॅटो क्लस्टरमध्ये राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी 5 हजार 684 हरकतींवर सुनावणी घेतली. 2 मार्च 2022 रोजी कवडे यांच्या सुस्पष्ट अभिप्रायांसह महापालिका आयुक्त यांच्यामार्फत हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे.

अॅटो क्लस्टरच्या सभागृहात सकाळी दहा वाजता सुनावणीला सुरुवात झाली. तक्रारदार नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिकांची मोठी गर्दी होती. आठ प्रभागनिहाय हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. 5 हजार 684 हरकतींचे 96 ग्रुप केले होते. ग्रुपमधील हरकतदार उपस्थित होते. प्रत्येकजण उपस्थित नव्हता. तक्रारीचा क्रमांक वाचून हरकतदाराला आपले म्हणने मांडण्याची संधी दिली जात होती. प्राधिकृत अधिकारी अनिल कवडे तक्रारदाराचे म्हणने ऐकून घेत होते. आयुक्त महापालिका आयुक्त राजेश पाटील, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी अपर जिल्हाधिकारी वर्षा उंठवाल, जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी नैयना बोदार्डे, आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रभाग 1, 5, 6, 7, 8, 10, 14, 20, 42 व 43 या प्रभागांबाबत हरकती आहेत. 14 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत सुमारे 5 हजार 684 हरकती आणि सूचना आल्या होत्या. या सर्व हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. यापैकी किती हरकती ग्राह्य धरणार की सर्वच फेटाळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 2 मार्च 2022 रोजी प्राधिकृत अधिका-यांच्या सुस्पष्ट अभिप्रायांसह महापालिका आयुक्त यांच्यामार्फत हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर 5 मार्च पर्यंत अंतिम आराखडा प्रसिद्ध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतरच किती हरकती स्वीकारल्या हे समजू शकणार आहे. दरम्यान, आम्ही हरकत घेतली नाही. तरीही सुनावणीची नोटीस आल्याच्या तक्रारी घेऊन काही नागरिक आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.