Pimpri News: शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असणारी 21 वर्षीय कोमल युद्धाच्या एक दिवस आधी परतलीय घरी!

जाणून घ्या कसा होता तिचा अनुभव

एमपीसी न्यूज – युक्रेन आणि रशिया या दोन देशांत युद्धाची ठिणगी पडली आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले चढवत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक काळूराम पवार यांची कन्या कोमल पवार ही वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होती. मात्र दोन देशांमधील वाद चिघळल्यानंतर युद्ध सुरू व्हायच्या एक दिवस अगोदर ती पिंपरी-चिंचवड शहरात परत आलीय. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोमलने युक्रेनमधील तिचा अनुभव ‘एमपीसी न्यूज’ सोबत शेअर केला आहे.

‘मी एमबीबीएस (वैद्यकीय) शिक्षणासाठी युक्रेनला गेले, मागील दोन वर्षांपासून माझं तिथंच शिक्षण सुरू आहे. मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांतील संबंध ताणले होते. उभय देशांत युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात होती पण, महाविद्यालय आणि तेथील सरकारच्या वतीने आम्हाला घाबरून जाऊ नका अशी सूचना केली. नंतर परिस्थिती अधिकच खराब होत गेली आणि मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (दि.24) रशियाने युद्धाला सुरुवात केली आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे बुधवारी (दि.23) मी भारतात परत आले,’ असे कोमल पवार म्हणाली

‘काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांचे पासपोर्ट देखील इमिग्रेशन ऑफिसमध्ये आहेत त्यामुळे त्यांना तिथून बाहेर पडता आले नाही. आम्ही रहायला होस्टेलमध्ये आहोत, तिथे असे बरेच परदेशी विद्यार्थी अडकून पडले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी तेथील विद्यार्थी करत आहेत.’ असे कोमल म्हणाली.

‘युक्रेनच्या तुलनेत रशिया खूप ताकदवान देश आहे. युद्ध विराम होऊन सगळं पूर्ववत व्हावे अशी इच्छा आहे पण, सध्यातरी ते कठीण आहे असं वाटतंय. सर्व पूर्ववत झाल्यास शिक्षणासाठी पुन्हा युक्रेनला परतेन,’ असं तिने सांगितले.

कोमलचे वडील माजी नगरसेवक काळूराम पवार म्हणाले, ‘माझ्या मुलीसारखे अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये सध्या अडकून पडले आहेत. दोन्ही देशांत सध्या तणावपूर्ण वातावरण आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. भारत सरकारने युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत घेऊन यावे.’

युक्रेनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण चांगलं आहे. त्याचबरोबर भारताच्या तुलनेत कमी खर्च लागतो असं पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकडे शिक्षणासाठी पाठवलं जातं. पण उभय देशांतील संघर्ष वाढल्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.