Pimpri News: महापालिकेतील भाजपची सत्ता जाणार असल्याने घाई, गडबडीत उद्घाटने; स्वपक्षीय नगरसेविकेकडून घरचा आहेर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपची सत्ता जाणार असल्याची खात्री भाजपला पटली आहे. शहराच्या महापौर उषा ढोरे यांना महापालिकेतील भाजपची सत्ता जाणार असल्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत घाई, गडबडीत गपचूप उद्घाटन कार्यक्रम आटपून घेतल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्याच नगरसेविका माया बारणे यांनी आज (गुरूवारी) पत्रकार परिषदेत केला. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांना यांना जाणीवपूर्वक कार्यक्रमाला टाळले जाते. नियंत्रण पत्रिका देण्याची केवळ औपचारिकता केली जाते. प्रत्यक्षात त्यांची वेळ घेऊन कार्यक्रम आयोजित केले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पणाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 5) घेण्यात आला. थेरगाव येथील ग्रेडसेपरेटर व इतर विकासकामांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याबाबत रोष व्यक्त करताना नगरसेविका बारणे यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. बारणे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन व्हावे यासाठी महापौरांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यासाठी रीतसर पत्र दिले. मात्र महापौरांनी अचानक मंगळवारी (दि. 4) सायंकाळी पाचला कार्यक्रमपत्रिका पाठविली.

अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत याचा विसर महापौरांना पडला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना कार्यक्रमासाठी बोलवायचे असेल तर त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांची वेळ घेणे आवश्यक आहे. मात्र सत्ताधार्‍यांकडून जाणूनबुजून त्यांची वेळ घेतली जात नाही. अचानक कार्यक्रमाचे निमंत्रण देत औपचारिकता पार पडली जाते, अशी टीका त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.