Pune News: सनसिटी रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण; वाहतूक कोंडी सुटणार

एमपीसी न्यूज: संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे शिवपुष्प पार्क ते विश्व मेडिकल या भागात होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या विकास निधीतून हे काम पूर्णत्वास गेले आहे.

सिंहगड रस्त्यावरून संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे जाणार रस्ता रुंद नसल्याने या भागातून ये जा करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता रुंद करून वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेविका नागपुरे या विशेष प्रयत्नशील होत्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार बैठका घेत त्या पाठपुरावा करत होत्या. हा रस्ता रुंद करण्यासाठी काही खासगी जागा मालकांची जागा ताब्यात घेणे आवश्यक होते. यासाठी देखील नागपुरे यांनी पुढाकार घेत प्रशासनातील अधिकारी आणि जागा मालक यांची बैठक घेतली होती.
रस्ता रुंदीकरणासाठी २८ गुंठे जागा देण्याची तयारी जागा मालक चरवड कुटुंबियांनी दाखविल्यानंतर ही जागा ताब्यात घेत तेथे काम सुरू करण्यात आले होते. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे तसेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविणे ही आमची जबाबदारी आहे. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पर्यायी रस्त्यांची कामे देखील सुरू असल्याचे नगरसेविका नागपुरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.