Pimpri News : लाक्षणिक संपाला पिंपरी- चिंचवड शहरात सराफांचा संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज – ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयुआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंवैधानिक बदलाच्या निषेधार्थ राज्यभरातील सुवर्णकारांनी आज, सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. या संपाला पिंपरी- चिंचवडमधील सराफांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आज दिवसभर पिंपरी व चिंचवडमध्ये काही ठिकाणे वगळता सुवर्ण पेढ्या बंद ठेवल्या होत्या.

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अमलात आणला. देशातील ज्वेलर्सने कायद्याचे स्वागत देखील केले. आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने होत होती. परंतु, बीआयएसने शुद्धतेच्या 4 प्रमाणित शिक्क्यांमध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची व असंविधानिक पद्धत आणली. इतकेच नव्हे, तर ही आणत असताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता हे बदल करण्यात आले. या पद्धतीमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही त्रास होणार आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने आज एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार केला आहे.

पिंपरी चिंचवड सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप सोनिगरा म्हणाले, ‘नव्यानं आलेल्या हॉलमार्किंग कायद्याला आमचा विरोध नाही. मात्र, एचयुआयडीला आमचा विरोध आहे. यातील जाचक आणि किचकट अटी यांचा छोट्या व्यावसायिकांवर परिणाम होणार आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरात एकूण 400 सराफ दुकाने आहेत. तर, हॉलमार्किंग करणारे दोन केंद्र आहेत, मुळात याठिकाणी पंचवीस अशा केंद्रांची गरज आहे. दागिने मिळण्यास उशीर झाल्यास ग्राहक एवढा वेळ थांबणार का हा ही प्रश्न आहे. नव्या कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज संप केला आहे,’ असे सोनिगरा म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.