Pimpri News: ‘सीसीसी’ सेंटरच्या नावाखाली अधिकारी, ठेकेदार, नगरसेवकांचा करदात्यांच्या पैशांवर दरोडा – नाना काटे

एमपीसी न्यूज- कोरोना केअर सेंटरच्या (सीसीसी) नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार आणि काही नगरसेवकांनी मिळून महापालिकेतील करदात्यांच्या पैशावर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकला आहे. या दरोड्याच्या टोळीचे सूत्रधार सत्ताधारी भाजप असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काटे यांनी म्हटले आहे की, या कोरोना सेंटरच्या भ्रष्टाचारात सत्ताधारी भाजप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त अजित पवार, भाजपमधील काही नगरसेवक असल्याचे दिसून येते. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आपल्यावर आरोप होताच स्वतःच्या पक्षातील नगरसेवकांना दुस-याच्या दावणीला बांधण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. तसेच भ्रष्टाराचारात सैराट झालेल्या सत्ताधारी भाजप व प्रशासनाविरोधात आम्ही आंदोलने करत आहोत व करणार आहोत.

या भ्रष्टाचारा विरोधात वेळप्रसंगी न्यायालयातही जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे गेले आहेत. राज्याच्या अर्थखात्याची महत्वाची जबाबाबदारी त्यांच्याकडे असल्याने दादा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व भ्रष्टाचाराचे ‘शुभ मंगल सावधान’ करणार आहेत, असेही काटे यांनी म्हटले आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चार विभागात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यावर आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आकडा प्रशासनाने व सत्ताधाऱ्यानी अद्याप जाहीर केला नाही. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा भ्रष्टाचाराचे पोर किती मोठे झाले हे सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना समजेल.

नुकतीच यातील एक झलक भोसरीतील दोन कोरोना केअर सेंटरला दिलेल्या खर्चावरून समजते. ते कोविड केअर सेंटर सुरू केल्याचा केवळ दिखावा केला होता. कोणतेही साहित्य, कर्मचारी उपलब्ध केले नसल्याने या सेंटरमध्ये एकाही कोरोना रुग्णांवर उपचार झाले नाहीत. तरीही कोट्यवधी रुपये देताना सत्ताधारी झोपले होते का? असा सवाल काटे यांनी विचारला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.