Pimpri News: एमपीसी न्यूजच्या फिचर्स आणि आर अँड डी विभागाच्या संपादकपदी राजन वडके यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजच्या फिचर्स आणि संशोधन व विकास (आर अँड डी) विभागाचे संपादक म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वडके यांनी नुकताच त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. 

एमपीसी न्यूज माध्यमसमूहाचे मुख्य संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर यांनी वडके यांचे स्वागत केले. त्यावेळी एमपीसी न्यूज कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पत्रकारांनी  सुरू केलेल्या आणि चालविलेल्या एमपीसी न्यूज मीडिया हाऊसमध्ये सहभागी झाल्याचा विशेष आनंद होत आहे. एमपीसी न्यूजच्या माध्यमातून डिजिटल मीडिया मध्ये अधिक आव्हानात्मक पत्रकारिता करण्याची संधी मिळणार आहे. एमपीसी न्यूजच्या वाचकांना अधिकाधिक दर्जेदार व वाचनीय मजकूर उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध नावीन्यपूर्ण उपक्रम देखील राबविण्याचा मानस असल्याचे वडके यांनी यावेळी सांगितले. एमपीसी न्यूजची लोकप्रियता आणि विश्वासार्हता आणखी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

वडके यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व विविध विषयांमधील त्यांचा व्यासंग यामुळे एमपीसी न्यूजची टीम अधिक मजबूत होईल, असा विश्वास मुख्य संपादक विवेक इनामदार यांनी व्यक्त केला. वडके यांचे अभिनंदन करून त्यांनी वडके यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

राजन वडके यांचा अल्पपरिचय 

राजन वडके यांचे शिक्षण बी.ए., डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन, शूटिंग अँड एडिटिंग कोर्स (फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) असे झाले आहे. त्यांनी १९८५ पासून पुणे तरुण भारत मधून पत्रकारितेस प्रारंभ केला. १९९० ते १९९३ या काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी यशस्वी काम केले. १९९४ ते २०१९ अशी २५ वर्षे अग्रगण्य दैनिक ‘सकाळ’ मध्ये त्यांनी बातमीदार, उपसंपादक, पिंपरी-चिंचवड आवृत्तीचे मुख्य वार्ताहर, मुख्य आवृत्तीचे मुख्य उपसंपादक अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्या. डिसेंबर २०१९ मध्ये ‘सकाळ’मधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. नंतर मुक्त पत्रकार म्हणून ते कार्यरत होते.

त्यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १९८६ पासूनच्या सर्व निवडणुका तसेच विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांचे वार्तांकन, परराज्यांतील निवडणुकीचे वार्तांकन, विधिमंडळ अधिवेशनाचे वार्तांकन, तसेच राजकारण, महानगरपालिका, गुन्हेगारी-पोलीस, न्यायालय, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक, उद्योग, कामगार आदी सर्व क्षेत्रांतील बातमीदारी व लेखनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.

औंध मधील ओहोळ खून खटला, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लेखा परीक्षणातील अक्षम्य त्रुटी, यापिशिका कंपनी वायूगळती, पवना नदी प्रदूषण व स्वच्छतेसाठी उपाययोजना (१९९७), पूररेषेतील अनधिकृत बांधकामे, महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील खरेदी गैरव्यवहार यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील औषध व उपकरणे खरेदी, आकुर्डीमध्ये बिबट्या, बजाज ऑटो कामगारांचे आंदोलन, टेल्को कामगारांचे १९९२ चे ऐतिहासिक उपोषण, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कामगारांचे आंदोलन, माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या (आयटी पार्क) विरोधातील हिंजवडी, माण ग्रामस्थांचे आंदोलन या आणि अशा अनेक विशेष बातम्यांचे वार्तांकन गाजले.

पत्रकारितेचा उपयोग समाज घडणीसाठी व्हावा यासाठी  सकारात्मक पत्रकारिता व लेखनावर त्यांचा नेहमीच भर असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.