PCMC TAX : मालमत्तेची स्वत: नोंदणी करा अन् मिळवा सामान्य करामध्ये 5% सवलत

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील नवीन मालमत्ता, वाढीव बांधकाम, वापरात फेरबदल केलेल्या मालमत्तांची कर आकारणीसाठी मालमत्ताधारकाला महापालिकेकडे (PCMC TAX) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ या योजनेद्वारे स्वयंस्फुर्तीने मालमत्ता कराची नोंदणी करणा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यावेळी सामान्य करात 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. 30 जूनपर्यंत नोंदणी करुन आगाऊ कर भरणा केल्यास 15 टक्के सवलत मिळणार आहे.

मालमत्ताधारकांने महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले. अनधिकृत बांधकामाचीही नोंद करता येणार असून या मालमत्तांना शास्तीकर लागणार आहे.

याबाबतची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.

PCMC Property Registration : घरबसल्या ‘अशी’ करू शकता मालमत्तेची नोंदणी!

ही योजना गेल्या वर्षी लागू केलेली असली. तरी, या योजनेचा पुढील टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. स्वतः आकारणी करून स्वतःच ती आकारणी अंतिम टप्प्यापर्यंत नेणे हे या योजनेतील महत्त्वाचे क्रांतिकारी पाऊल आहे.

लोकसहभागावर भर

लोकशाहीमध्ये लोकांना कुठल्याही प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे महत्त्वाचे असते. लोकांच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेऊन प्रशासकीय यंत्रणा प्रतिसादशील व गतिमान करण्याचे मोठे उद्दिष्ट गाठण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, ”कोरोना काळात अनेक बांधकामे नव्याने झाल्याचे निदर्शनास आले आहेत, अशा मिळकतींची कर आकारणी होणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणेत जलद प्रक्रीयेसाठी व नागरिकांच्या मालमत्तेची नोंद व्हावी, याकरीता महापालिकेमार्फत (PCMC TAX) “माझी मिळकत माझी आकारणी” ही योजना राबविण्यात येत आहे.

Pimpri Municipal Corporation : शहरातील एक लाख मालमत्तांची महापालिकेकडे नोंदच नाही!

कर किती व कसा आकारला जातो, याबाबत नागरिकांना माहीती नसल्याने मालमत्तेची नोंदणी होत नाही. त्यामुळे कर रुपातून महापालिकेचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी व नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जागृतीसाठी ही योजना उपयोगी ठरणार आहे”.

”या योजनेद्वारे करदात्याला सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वतः च्या मिळकतीची आकारणी स्वतः च करता येणार आहे. एवढेच नाही तर कर आकारणी मान्य असल्यास लगेचच मिळकत कर भरता येणार आहे. कर भरल्यानंतर महापालिकेमार्फत भौतिक सर्वेक्षण म्हणजे प्रत्यक्ष मोजमाप करण्यात येते आणि त्या सर्वेक्षणच्या आधारे संबंधित अर्जानुसार कर आकारणी केली जाते. या पद्धतीमध्ये जाणारा वेळ, होणारी दिरंगाई टाळण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल महापालिका उचलत आहे. मे, जून महिन्यात पथदर्शी स्वरुपात ही योजना राबविण्यात येणार आहे”.

लोकाभिमुख प्रशासन

मिळकतधारकाने स्वत: www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावरील शिघ्रगणकाद्वारे मिळकतकराच्या नोंदणीसाठी अर्ज करून करआकारणी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या सेवेमुळे कोणत्याही मिळकत करदात्याला, नागरिकांना स्वतःच्या नवीन मिळकतीची, मिळकतीच्या बदलाची किंवा वापरातील बदलाची नोंद स्वतःहून करता येणार आहे.

या बदलाची नोंद मिळकत करदात्याने केल्यानंतर सोप्या पद्धतीने कर भरता येणार आहे. तसेच या मिळकतीची नोंद महापालिकेच्या (PCMC TAX) करआकारणी रजिस्टरला देखील होणार आहे. हा उपक्रम कदाचित देशातील पहिला उपक्रम असेल, असा दावाही देशमुख यांनी केला.

अनधिकृत बांधकामाचीही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्या बांधकामाला शास्तीकर लागू होईल. ऑनलाइन अर्ज भरताना अनधिकृत बांधकाम अधिकृत दाखविल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.