Pimpri News: थेट पद्धतीने 40 कोटी रुपयांचे काम देण्याचा डाव उधळला; चुकीच्या कामास ब्रेक लागला – राहुल कलाटे

  राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी मानले आयुक्तांचे आभार

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीअंतर्गत औंधचा राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाइननुसारचे 40 कोटी रुपयांचे काम थेट पद्धतीने देण्याचा डाव शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी हाणून पाडला. सुमारे 40 कोटींचे काम स्मार्ट सिटीचे ठेकेदार बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्सनला थेट पध्दतीने देण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला होता. कलाटे, शितोळे यांच्या तक्रारीनंतर  स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांनी हे काम स्वतंत्र निविदा करुन करण्यात येणार असल्याचे लेखी पत्राद्वारे 31 जानेवारी 2022 रोजी कलाटे यांना कळविले. यामुळे सत्ताधा-याच्या चुकीच्या कामास ब्रेक लागल्याचे कलाटे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते. कलाटे म्हणाले की, औंध ते किवळे या 14  किलोमीटर अंतराच्या बीआरटीएस रस्ता चांगल्या स्थितीत आहे. असे असतानाही नागरिकांची मागणी नसताना या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार काम केले जात आहे. तसेच ड्रेनेज समपातळीवर करुन डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी एकूण सुमारे 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कामाची गरज नसताना केवळ टक्केवारीसाठी सत्ताधा-यांनी काम काढले आहे. ते काम ठराविक ठेकेदाराला थेट पध्दतीने देण्याचा घाट सत्ताधा-यांनी घातला होता. त्याबाबत आयुक्तांकडे तक्रार करीत सुनावणीची मागणी केली होती.

या तक्रारींची दखल घेत औंध ते जगताप डेअरी रस्ताचे काम थेट पध्दतीने न देता निविदा काढण्यात येणार असल्याचे उत्तर आयुक्तांच्यावतीने स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांनी दिले आहे.  आयुक्तांच्या भूमिकेमुळे सत्ताधा-यांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराल ब्रेक लागला आहे. तसेच त्या रस्त्यावर गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला असूनही खोटी माहिती देणा-या बीआरटीएस विभागाची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. शितोळे म्हणाले की, भाजपच्या पाच वर्षांच्या काळात हे पहिलेच काम आयुक्तांनी थांबविली आहे. निविदा काढून काम केल्याने खर्च 25 ते 30 टक्क्यांनी कमी होईल. दापोडी ते निगडी मार्गावर खर्च न करता, जेथे दुरुस्ती करता येईल, तेथे करुन बचत करावी, असा सल्ला प्रशांत शितोळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.