Pimpri News: शिवसैनिकांनो, संघटना मजबूत करा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक वर्षभरावर आली आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा. ज्या भागात ताकद कमी आहे. तिथे ताकद वाढविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेना मिशन 2022’ अभियान सुरु आहे. यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्याअंतर्गत शिवसेनेच्या प्रभागनिहाय बैठका सुरु आहेत. पिंपरी, संत तुकारामनगर येथे नुकतीच बैठक झाली. त्यावेळी खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, युवापदाधिकारी जितेंद्र ननावरे, विभागप्रमुख राजेश वाबळे, अभिजीत गोफण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, ”महापालिकेतील अनागोंदी कारभार, सत्ताधाऱ्यांकडून होत असलेली चुकीची कामे जनतेपुढे मांडा. महापालिकेतील भ्रष्टाचार, गैरकारभाराच्या वृत्तपत्रात येणा-या बातम्यांचे कात्रण काढून घरोघरी पोहचावावेत. जेणेकरुन महापालिकेतील चुकीचा कारभार जनतेपर्यंत पोहचेल. सर्वजण वृत्तपत्र घेतात, वाचतात असे नाही. सर्वच बातम्या जनमाणांसापर्यंत पोहचतात असे नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या बातम्या लोकांपर्यंत पोहचवून त्यांना वस्तुस्थिती पटवून द्यावी”.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला मानणारा मतदार मोठ्या संख्येने आहे. त्या मतदाराला एकत्रित करुन महापालिका निवडणुकीत जनाधार वाढवायचा आहे. वर्षाचा कालावधी फार कमी आहे. नागरिकांना सत्य पटवून देण्याची वेळ आली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सक्षमपणे काम करत आहे. शास्तीकर वगळून मूळ कर स्वीकारणे, 2020 पर्यंत बांधलेल्या बांधकामांना संरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय जनतेपर्यंत पोहचवा”.

शहर संघटिका उर्मिला काळभोर म्हणाल्या, ”शहरात महिला मतदार 50 टक्के आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त महिलांना एकत्र करावे. सरकारच्या योजना महिलांपर्यंत पोहचवून महिला सक्षमीकरणाकडे शिवसैनिकांनी लक्ष द्यावे.

पक्षाच्या माध्यमातून केवळ निवडणुकीला सामोरे जायचे नाही. प्रत्येक घरातील महिला सक्षम करायची आहे. त्याचबरोबर संघटना बांधणीचे काम देखील करायचे आहे”.

जितेंद्र ननावरे, अभिजित गोफण यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केले. तर, राजेश वाबळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.