Nigdi News : आधार-रेशन लिंक करणाऱ्यांकडून होत आहेत गंभीर चुका !

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीचा आधार क्रमांक दुस-याच व्यक्तीच्या रेशन कार्डला लिंक झाल्यामुळे संबंधित ग्राहकाला मार्चपर्यंतचे रेशन नाकरले गेल्याची घटना शहरात घडली आहे. मारुती शिवशरण, असे या ग्राहकाचे नाव आहे.

केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे आता आधार कार्ड रेशन कार्डला लिंक करणे बंधनकारक आहे. यामुळे बनावट रेशन कार्डांचे प्रमाण कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. परंतु, आता शहरात एकाचे आधार कार्ड दुस-याच व्यक्तीच्या रेशन कार्डाला जोडण्याचे प्रकार होत आहेत. हा नेमका गलथानपणा की जाणीवपूर्वक केलेल्या चुका, हे कळण्यास मार्ग नाही.

याबाबत मारुती शिवशरण म्हणाले, “रेशनचे सामान भरण्यासाठी गेलो असतारास्त भाव दुकानदाराने माझा व मुलीचा आधार क्रमांक दुस-या व्यक्तीच्या कार्डावर लिंक झाल्याचे सांगितले. यामुळे माझे रेशनही नाकारले गेले. याबाबत परिमंडळ कार्यालयात एक खिडकी योजनेत मी अर्ज देऊन माझा व मुलीचा अधार क्रमांक दुस-या व्यक्तीच्या कार्डावरून रद्द करून माझ्या रेशन कार्डाला जोडण्याची विनंती केली.

त्यांनतर या प्रक्रियेला तीन महिने लागणार असल्याचे मला सांगण्यात आले. तसेच तुम्ही रेशन घेऊ शकता, असेही सांगितले गेले.

मात्र, दुस-याच्या कार्डावरून आधार रद्द होऊन स्वत:च्या रेशन कार्डाला आधार लिंक होत नाही, तोपर्यंत रेशन देऊ शकत नसल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यामुळे मला मनस्तापाला तोंड द्यावे लागत असल्याचेही शिवशरण यांनी सांगितले.

ही एकच घटना नसून शहरात अशा 15 पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. शिवशरण यांच्या ओळखीतील आणखी काही लोकांना अशाच प्रकारच्या अडचणी आल्याचेही त्यांनी सांगितले.

एका रेशन दुकानदाराच्या म्हणण्यानुसार आधार-रेशन लिंक करण्याच्या प्रक्रियेसाठी व काही अपडेशन करण्यासाठी विलंब लागतो. कारण संबंधित संकेतस्थळाचे सर्व्हर सतत डाऊन असते. त्यामुळे कधी थोडा, तर कधी बराच वेळ लागू शकतो.

एकाचे आधार कार्ड दुस-याच्याच रेशन कार्डला जोडण्याच्या चुका रेशन दुकानदार, पुरवठादार तसेच तहसिल कार्यालयातील संबंधितांकडून होत असल्याने याचा नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सहाय्यक परिमंडळ अधिकारी हेमंत भोकरे म्हणाले, “अशा चुका होण्याची शक्यता असते. तसेच या अपडेशनच्या कामाला 45 दिवसांचा कालावधी लागतो. चुका घडलेल्या संबंधित नागरिकांनी अर्ज करावा. त्यानंतर चुका दुरुस्त करता येतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.