Pimpri News: निगडी-दापोडी महामार्गावर पदपथ, सायकल ट्रॅकचे नियोजन, 100 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई महामार्गावर सलग पदपथ, सायकल ट्रॅक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या कामासाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

निगडी जकात नाका ते दापोडी हॅरिस उड्डाणपुलापर्यंतचा साडेअकरा किलोमीटरचा रस्ता महापालिका हद्दीतून जातो. महामार्ग म्हणविणाऱ्या या रस्त्याची रुंदी पूर्वी 20 ते 25 मीटर इतकीच होती. विकास आराखड्यानुसार महामार्गांचे रुंदीकरण 61 मीटर करण्याचे ठरले. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर सुशोभीकरण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) सन 2005-06 मध्ये सर्वंकष प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली. सन 2006 मध्ये रस्ता विकसनाचे काम हाती घेण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामफलक, रस्ता ओलांडण्यासाठी उपरस्ते, फुटओव्हर ब्रिज उभारण्याचे ठरले.

गेल्या पंधरा वर्षांत महामार्ग विकसन कामांतर्गत या रस्त्याचे काँक्रिटीकरण, ग्रेड सेपरेटर कामे करण्यात आली. त्यावर 550 कोटींहून अधिक खर्च झाला. कासारवाडी येथील उड्डाणपुलाने 120 कोटींचा पल्ला गाठला. याच मार्गावरून मेट्रो रेल्वेचे काम प्रगतिपथावर आहे. या मेट्रोसाठीही महापालिकेला पैसे मोजावे लागणार आहे. आता याच मार्गांवर 100 कोटींचा चुराडा करण्याचा घाट घातला आहे. शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांच्या पुढे जाऊन पोहचली आहे. नागरीकरणाचा वेगही चांगलाच वाढला आहे.

अशा परिस्थितीत शहरात जागतिक स्तरावरच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने सार्वजनिक वाहतूक आणि खासगी मोटार विरहित वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सायकलच्या माध्यमातून प्रवास करणे आणि पायी चालणे यासाठी आवश्यक सुविधा दिल्या जात आहेत. महापालिकेने पिंपळे निलख आणि आकुर्डी भागातील काही रस्त्यांवर सध्या ही सुविधा दिली आहे. या सुविधेमध्ये सलग पदपथ आणि सायकल ट्रॅक बनविण्यात आले आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी या अंतरातही अशीच सुविधा देण्याचे नियोजन आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते हॅरिस ब्रिज (दापोडी) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भक्ती-शक्ती चौक (निगडी) अशा दोन टप्प्यांत हे काम केले जाणार आहे. महापालिकेच्या 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात प्रत्येक भागासाठी 50 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून प्रसन्न देसाई आर्किटेक्ट अ‍ॅण्ड अर्बन डिझाइनर सह मेसर्स मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नेमणुकीची शिफारस आयुक्तांनी केली. त्यांना प्रकल्प खर्चाच्या 2 टक्के शुल्क अदा केले जाणार आहे.

निगडी ते दापोडी रस्त्यात केबल टाकणे, जलवाहिनी टाकणे तसेच मेट्रोचे सुरू असलेले काम यांसाठी वारंवार खोदकाम करण्यात आले. या कामांमुळे येथे सलग पदपथ शिल्लक राहिलेले नाही. पर्यायाने नागरिकांना जिथे पदपथ नाही तिथे रस्त्यावरून अपघाताचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत सलग पदपथ उपलब्ध झाल्यास गैरसोय दूर होणार आहे, तसेच शहरातील वाढत असलेली वाहनसंख्या लक्षात घेता प्रदूषण नियंत्रणासाठी सायकल चालविण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.