Pimpri News: स्थायी समिती अध्यक्षांवरील कारवाईचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करणार – मिसाळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेल्या कारवाई संदर्भात शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सविस्तर माहिती घेवून संबंधित अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवणार आहे, अशी माहिती शहर प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती दालनात बुधवारी लाच लुचपत विभागाने कारवाई केली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपावर झालेल्या आरोप प्रकरणी माहिती घेवून अहवाल सादर करण्याची जबाबदारी पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवली होती.

त्यानुसार आमदार मिसाळ यांनी शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी भेट घेवून चर्चा केली. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्याशी आमदार मिसाळ यांनी दूरध्वनीवर संपर्क साधला. तसेच, महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेवून माहिती घेतली. सर्व आढावा घेवून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अहवाल पाठवणार असून, त्यावर योग्य ती भूमिका प्रदेशाध्यक्ष मांडतील, असेही आमदार मिसाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.