Pune Crime News : फसवणूक करून परराज्यात वाहने विकणारी टोळी जेरबंद, 1 कोटी 22 लाख किंमतीची 13 वाहने हस्तगत

एमपीसी न्यूज – फसवणूक करून परराज्यात वाहने विकणा-या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 22 लाख किंमतीची 13 वाहने हस्तगत करण्यात आली आहे. नोएडा येथील कंपनीत भाडे तत्वावर गाडी लावतो, असे सांगून आरोपींनी जवळपास 28 वाहने ताब्यात घेतली होती.

मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (वय 38, रा. कोंढवा, पुणे), ओंकार ज्ञानदेव वाटणे (वय 28, रा. दौंड, पुणे), मोहम्मद मुजीब बसीर उद्दीन (वय 48, रा. हैदराबाद, तेलंगणा) असे अटक आरोपींची नावे आहेत.  याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी मलिक बाबा यांच्याशी ओळख झाली. यादरम्यान आरोपीने फिर्यादी यांची चारचाकी नोएडा येथील कंपनीत भाडे तत्वावर लावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर 15 मार्च ते 27 जुलै 2021 या कालावधीत फिर्यादी आणि इतरांकडून अशी 28 वाहने एकत्र करून त्याची जीपीएस सिस्टिम काढून टाकण्यात आली. आरोपी फरार झाल्यानंतर फिर्यादी यांनी नोएडा येथे जाऊन कंपनीबाबत चौकशी केली असता, त्याठिकाणी कोणतीही कंपनी नसल्याचे आढळून आले.

दाखल फिर्यादीवरून गुन्हे शाखेच्या युनिट सहाने याबाबत तपास सुरू केला. दरम्यान, या गुन्ह्यातील एक इनोव्हा कार दौंड बसस्थानक परिसरात विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार युनिट सहाच्या वतीने दौंड बसस्थानक परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 1 कोटी 22 लाख किंमतीची 13 वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.