Pune News : कोविड नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस पथक नेमावे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज – कोविड साथ नियंत्रणासाठी शासनाने नागरिक आणि संस्थांसाठी नियम घालून दिलेले आहेत. त्यांचे पालन होत नसेल तर, त्यावर कारवाईसाठी पोलीस पथक नेमावे, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) कोविड आढावा बैठकीत केली.

कोविड साथीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आमदार शिरोळे यांनी पोलीस पथक नेमावे आदी सूचना केल्या. कोविड साथीच्या काळात महाराष्ट्रातील पोलीसांवर कामाचा ताण वाढला. तरीही, त्यांनी चांगले काम केले. परंतु, साथीची तिसरी लाट रोखली जावी आणि साथ पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी नागरिक आणि संस्था यांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा ते न करणाऱ्यांवर कारवाई करावी. याकरिता स्वतंत्र पोलीस पथक नेमावे. हे पोलीस पथकही उत्तम काम करुन साथ नियंत्रणात मदतच करेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

अनेक देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. त्या पद्धतीचा अभ्यास करुन महाराष्ट्रातही शाळा, कॉलेजेस सुरू करावीत, असे आमदार शिरोळे यांनी सुचविले. कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी वस्ती पातळीवर प्रबोधन केले जावे. पोस्ट कोविड रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने शासनाने त्यावर लक्ष केंद्रीत करावे. पुण्यात कोविड प्रतिबंधासाठी चाललेल्या सर्व पक्षीयांचे प्रयत्न आणि प्रशासनाचे कार्य याचे डॉक्युमेंटेशन करावे, अशा सूचनाही आमदार शिरोळे यांनी केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.