Sangvi Crime News : संपत्तीच्या कारणावरून पत्नीचा छळ; पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीच्या नावावर असलेला फ्लॅट विकण्यासाठी पत्नीने नकार दिला. तसेच तिचे दागिने विकण्यासाठी देखील पत्नीने नकार दिला. या कारणावरून पतीने पत्नीचा छळ करत तिला गोळ्या खाऊ घातल्या. तसेच तिच्या बँक खात्यावरून 50 लाख रुपये पतीने स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 जानेवारी 2016 पासून 19 ऑगस्ट 2021 या कालावधीत कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथे घडली.

सुब्रमण्यमनियन पद्मनाभन अय्यर (वय 41, रा. कोकणे चौक, पिंपळे सौदागर) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या नावावर असलेला फ्लॅट विकण्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. त्यावरून आरोपी पतीने फिर्यादी यांना फोन वरून शिवीगाळ करून तुझ्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याकडे असलेले सोने आरोपीने मागितले. सोने विकून माझे काम करतो, असे म्हणत आरोपी पतीने फिर्यादी यांना ब्लॅकमेल केले. ‘जर तू मला तुझ्याकडचे सोने दिले नाही तर मी तुला कुठेच नोकरी करू देणार नाही’, अशा प्रकारची धमकी आरोपीने दिली.

फिर्यादी यांनी पतीला पैसे दिले नाहीत म्हणून पतीने त्याच्या मावशीकडून कसल्यातरी गोळ्या आणून फिर्यादी वेडी झाली आहे असे भासवून त्यांना गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर पतीने फिर्यादी यांच्या मोबाईलमधून त्यांच्या खात्यावर असलेले 50 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यावर आरटीजीएस द्वारे ट्रान्सफर करून घेतले. फिर्यादी यांना घराची प्रॉपर्टी विकण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.