Pimpri News: ‘वायसीएमएच’मध्ये पदव्युत्तर संस्थेसाठी दहा सदस्यांची नीती समिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुगणालयाच्या पदव्युत्तर संस्थेसाठी नीती समितीला परवानगी मिळाली आहे. या समितीत दहा सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मानांकानुसार यातील पाच सदस्य बाहेरील असून त्यात विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर, वकील, नीती समिती अध्यक्ष, औषधशास्त्रज्ञ, सामाजिक शास्त्रज्ञ आदी सदस्यांचा समावेश असणार आहे.

भारतीय आयुर्विज्ञान परिषद, दिल्लीच्या मार्गदर्शक मानांकानुसार वायसीएम पदव्युत्तर संस्थेस नीती समिती आवश्यक होती. आगामी काळात वायसीएम रुग्णालयात विविध कंपन्यांनी प्रायोजित केलेले अथवा सरकारी संस्थेचे संशोधन, शोध, प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. पदव्युत्तर संस्थेत काम करणारे प्राध्यापक विविध संशोधन प्रकल्प हाती घेणार आहेत.

सर्व शोध प्रकल्पांचे काम सुरू करण्यापूर्वी व शोधनिबंध वैद्यकीय नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यापूर्वी नीती समितीचे परवानगी घेणे आवश्यक असते. हे सर्व विषय नीती समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांसमोर सादर करणे गरजेचे असते. आतापर्यंत समितीच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. आगामी काळात बैठकांची संख्या वर्षातून पाच ते सहा होऊ शकते.

आगामी काळात संशोधन प्रकल्पातून महापालिकेस आरोग्य संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. यामुळे महापालिकेचे आर्थिक उत्पनात वाढ होणार आहे. त्याचबरोबर शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. महापालिकेच्या स्थायी समिती समोर हा प्रस्ताव ठेण्यात आला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

नीती समिती अध्यक्ष व सचिव यांना प्रत्येक सभेसाठी तीन हजार रुपये मानधन मिळणार आहे. इतर सदस्यांना प्रत्येक सभेसाठी पंधराशे रुपये मिळणार आहेत.

तसेच राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार महापालिका हद्दीबाहेर वास्तव्यास असणाऱ्या समिती सदस्यांना प्रत्येक सभेसाठी प्रवास भत्ता मिळणार आहे. प्रति किलोमीटर 9 रुपये या दराने पेट्रोल मिळणार आहे. डिझेल प्रति किलोमीटर 7 रुपये दराने मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.