Pimpri News: बोगस ‘एफडीआर’ प्रकरण धुमसतेय; ‘स्थायी’ची सभा लांबणीवर

साडेतीन खोक्यांची चर्चा

एमपीसी न्यूज – वाढीव खर्च, बोगस एफडीआर प्रकरणावरुन पिंपरी महापालिका स्थायी समिती सदस्यांमध्ये वाद धुमसत आहे. त्यावरुन सदस्यांमध्ये विसंवाद वाढला आहे. एफडीआर प्रकरणात साडेतीन खोक्यांचा व्यवहार झाल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. हेच वादाचे निमित्त ठरले आणि आजची स्थायीची सभा गणसंख्येअभावी तहकूब करावी लागली. भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना असे पंधराही सदस्य महापालिका मुख्यालयात असताना स्थायी समिती सभागृहात फिरकले नाहीत. परिणामी, सभागृहात एकट्याच असलेल्या अध्यक्षांनी आजची सभा शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) होती. विषयपत्रिकेवर 60 विषय होते. सभेची वेळ दुपारी अडीच वाजताची होती. अध्यक्ष संतोष लोंढे सभागृहात गेले. पण, महापालिका मुख्यालयातच असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सदस्य स्थायीच्या सभागृहाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे अध्यक्षांनी गणसंख्येअभावी आजची सभा शुक्रवार (दि.8) पर्यंत तहकूब केली.

बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून कंत्राट घेत महापालिकेची फसवणूक करणा-या 18 ठेकेदारांवर फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यातील सबळ कागदपत्रे हाती लागलेल्या पाच ठेकेदारांविरोधात गुन्हे नोंदविण्यासाठी महापालिकेने मंगळवारी (दि.5) पिंपरी पोलिसांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे. तर, उर्वरित 13 ठेकेदारांविरोधात कारवाई कधी होणार याची उत्सुक्ता लागली आहे.

बनावट एफडीआर आणि बँक हमी देऊन महापालिकेची फसवणूक करणा-या 18 ठेकेदारांना काळया यादीत टाकण्यात आले आहे. असे असले तरी त्यांच्याकडूनच अर्धवट कामे पूर्ण करुन घ्यावीत. प्रसंगी नवीन एफडीआर, बँक गॅरंटी घेवून कामे मार्गी लावा असा सदस्यपारित ठराव 30 डिसेंबर 2020 रोजीच्या स्थायी समिती सभेत झाला आहे.

त्यामध्ये तीन खोक्यांचा व्यवहार झाल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्या ठरावावरुनच स्थायी समिती सदस्यांमध्ये विसंवाद वाढला आहे.

ठेकेदारांना काळ्या यादीत टाकू नये. काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांकडूनच अर्धवट कामे करुन घेण्याचा स्थायीतील एका गटाचा आग्रह आहे. ठेकेदारांकडून माया गोळा केल्यामुळेच काही सदस्यांनी महापालिकेची फसवणूक करणा-या ठेकेदारांविरोधात नरमाईची भूमिका घेतल्याचा एका गटाचा आक्षेप आहे.

तर, फसवणूक करणा-या ठेकेदारांकडून कामे करुन घेण्यास एका गटाचा तीव्र विरोध आहे. त्यावरुन सदस्यांमध्ये वाद धुमसत आहे. त्यातूनच ठेकेदारांच्या बाजूने असणारा एक गट आणि विरोधातील एक गट अशा दोन्ही गटांनीही सभेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. सदस्यांनी आजच्या सभेकडे पाठ फिरविली.

विशेष म्हणजे भाजपसह विरोधी राष्ट्रवादी, शिवसेनेचे पंधराही सदस्य महापालिका मुख्यालयात उपस्थित असताना स्थायीच्या सभागृहाकडे फिरकले नाहीत. केवळ समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे सभागृहात हजर होते. सदस्य सभागृहात येत नसल्याने अध्यक्षांनी गणसंख्येअभावी आजची सभा शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

याबाबत बोलताना नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, गणसंख्येअभावी स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. सभेच्या वेळेत सभागृहात फक्त अध्यक्षच होते. इतर कोणीही सदस्य नसल्याने अध्यक्षांनी सभा तहकूब केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.