Pimpri News: प्रभाग रचनेच्या हरकती आयोगाला सादर; 26 फेब्रुवारीला सुनावणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आलेल्या  हरकती व सूचनांची यादी महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला आज (गुरुवारी) सादर केली.  5 हजार 664 हरकती वर्गीकरण करुन आयोगाला पाठविल्या आहेत. त्यावर 26 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार 2011  ची लोकसंख्या विचारात घेऊन प्रारुप प्रभाग रचना केली आहे. महापालिकेची  प्रभाग रचना 1 फेब्रुवारी  रोजी प्रसिद्ध झाली. 139 नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. प्रभाग रचनेवर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविल्या होत्या. सर्वाधिक हरकती भोसरी विधानसभा मतदार संघातील आहेत.

प्रभाग 1, 5, 6, 7, 8, 10, 14, 20, 42  व 43 या प्रभागांबाबत हरकती आहेत. सोमवारपर्यंतच्या मुदतीत 5 हजार 664 हरकती आल्या आहेत. व्याप्तीबाबतच्या सर्वाधिक हरकती असून नागरिक, विद्यमान नगरसेवकांनीही हरकती घेतल्या आहेत. आलेल्या हरकतींचे हद्द, वर्णन, नाव, आरक्षण व इतर अशा पाच पद्धतीने वर्गीकरण करण्यात आले. एकाच प्रकारच्या व विशिष्ट प्रभागाशी संबंधित हरकती एकत्र करून त्याची यादी आयोगाला सादर केल्याचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कवडे 26 फेब्रुवारी रोजी हरकतींवर सुनावणी घेणार आहेत. 2 मार्च 2022 रोजी प्राधिकृत अधिका-यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर 5 मार्च पर्यंत अंतिम आराखडा प्रसिद्ध होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.