Pimpri News: शाश्वत विकासासाठी नागरी सहभाग महत्वाचा; महावाणिज्य दूत डॅमियन इरझिक

एमपीसी न्यूज -शाश्वत विकासासाठी नागरी सहभाग आणि समाधान महत्वाचे असून नागरिकांच्या संकल्पनांमधून शहराची जडणघडण उत्तम पद्धतीने होत असते, असे प्रतिपादन पोलंडचे भारतातील सहाय्यक महावाणिज्य दूत डॅमियन इरझिक यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील माहिती आणि तंत्रज्ञान, संस्कृती त्याचबरोबर औद्योगिक व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी डॅमियन इरझिक यांनी शहराला भेट दिली. त्यावेळी बोलत होते. महापौर उषा ढोरे यांनी डॅमियन इरझिक यांचे स्वागत केले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे आणि डॅमियन इरझिक यांच्यामध्ये महाराष्ट्रीयन संस्कृती आणि पोलंड देशातील संस्कृती तसेच शहरातील विविध विकास कामे आणि प्रकल्पांबद्दल चर्चा झाली. पोलंड आणि महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक संदर्भांना उजाळा  इरझिक यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला विकास प्रशंसनीय आहे. पोलंडमधील शहरांच्या तुलनेने पिंपरी-चिंचवड शहर लोकसंख्या, क्षेत्रफळ आदींबाबत मोठे असून देखील महापालिकेमार्फत नागरिकांना देण्यात येणा-या सुविधांचे व्यवस्थापन उत्तम आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि पोलंड देशातील महत्वाच्या शहरांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान, संस्कृती त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणूक आदींबाबत आदानप्रदान करण्यासाठी सिस्टर सिटी सामंजस्य करार करण्याचा मानस आहे, असे पोलंडचे भारतातील सहाय्यक महावाणिज्य दूत डॅमियन इरझिक यांनी सांगितले.

पक्षनेते नामदेव ढाके आणि स्थायी समिती सभापती ॲड.नितीन लांडगे यांनी पोलंडमधील विविध शहरांमधील विकासकामे, प्रशासकीय कामकाज आदींबाबत सविस्तर माहिती घेतली. पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून महापालिकेच्या कामाच्या पद्धतीबद्दल पक्षनेते ढाके यांनी इरझिक यांना माहिती दिली.

पोलंडमध्ये नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे आदान प्रदान झाल्यास पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला नक्कीच हातभार लागेल असेही ढाके यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आयुक्त राजेश पाटील आणि डॅमियन इरझिक यांच्यामध्ये शहरातील नियोजित विकासकामे, स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेले विविध प्रकल्प आणि भविष्यातील शहराचे नियोजन आदी बाबत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी तथा स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते. संगणकीय सादरीकरणाद्वारे पिंपरी चिंचवड शहराच्या नगरपरिषद ते स्मार्ट सिटी पर्यंतच्या प्रवासाबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. गुंतवणुकीसाठी शहरामध्ये महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणा-या सुविधांबाबत देखील यावेळी इरझिक यांना माहिती देण्यात आली.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून पायाभूत सुविधांचा प्राधान्य क्रम निश्चित करण्याचे धोरण महानगरपालिकेने हाती घेतले असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना गतिमान सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.