Pimpri News: जिजामाता रुग्णालयात पार पडली 28 कर्मचा-यांवर कोरोना लसीकरणाची ‘ड्राय रन’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात 28 कर्मचा-यांवर लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात एकालाही लस टोचण्यात आली नाही.

ड्राय रनवेळी आरोग्य विभागाच्या संचालका डॉ. अर्चना पाटील, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप पाटील, उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ.संजय देशमुख, ‘युनिसेफ’चे सल्लागार डॉ.सतिष डोईफोडे, सर्वेलन्स मेडिकल ऑफिसर (डब्ल्यु.एच.ओ.) डॉ.चेतन खाडे, रिजनल टिम लिडर डॉ. राहुल शिंपी, लस व शितसाखळी व्यवस्थापक निरज गुप्ता, महापालिका अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.पवन साळवे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.संगिता तिरुमणी, डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, डॉ.वर्षा डांगे, पीएचएन शोभा ढोले उपस्थित होते.

कोरोना वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त सुचनांनुसार कोरोना लसीकरणाबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. शासन मार्गदर्शक सुचनेनुसार कोरोना लसीकरणाची ड्राय रन (रंगीत तालीम) आज देशभर घेण्यात आली.

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयाची निवड कोरोना लसीकरणाची ड्राय रन (रंगीत तालीम) साठी केलेली होती. त्यानुसार कोरोना लसीकरणाची ड्राय रन (रंगीत तालीम) नवीन जिजामाता रुग्णालयात घेण्यात आली.

या ड्राय रन (रंगीत तालीम) मध्ये 29 लाभार्थींना लसीकरणासाठी निवडण्यात आले होते. त्यामधील 28 लाभार्थी यांच्यावर लसीकरण प्रात्यक्षिकाची रंगीत तालीम करण्यात आली. पण, प्रत्यक्षात लस टोचण्यात आलेली नाही.

एका लाभार्थ्याने लसीकरणास नकार दर्शविला याचेही प्रत्यक्षिक यावेळी घेण्यात आले. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा या सोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार करण्यात आलेले आहेत.

लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवले जाते. ही सर्व प्रक्रिया आज केवळ ड्राय रन म्हणून पार पडली आहे. प्रत्यक्षात अद्याप कोणालाही लस देण्यात आलेली नाही. लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.