Talegaon News : योग प्रात्यक्षिके, नेत्रदीपक नृत्ये, तालयात्रा यांनी गाजला कलापिनीचा वर्षान्त 2020 महोत्सव

अभिनव उपक्रमाचे 23 वे वर्ष

एमपीसी न्यूज – बाल कलाकारांची नेत्रदीपक नृत्ये, गायन, 12 वर्षाखालील मुलांची चित्तथरारक योग प्रात्यक्षिके अशा विविध रंगी कार्यक्रमांच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत सांस्कृतिक जल्लोषात  कलापिनीचा वर्षान्त 2020 महोत्सव संपन्न झाला.

कलासंस्कृतीच्या संगमावर नवीन वर्षाचे स्वागत या अभिनव संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचे हे 23 वे वर्ष होते. कलापिनी व कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 3 तास रंगलेल्या या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षाच्या अखेरीस मद्दधुंद पार्ट्या, धांगडधिंगा हा सशक्त सांस्कृतिक उपक्रमाचा पर्याय तळेगावच्या युवकांनी स्वीकारल्याने हा कार्यक्रम मावळवासियांसाठी महत्त्वाचे आकर्षण ठरला आहे कलापिनीच्या नवीन भव्य रंगमंचावर हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

या वर्षीच्या कोविड 19 च्या आपत्तीमुळे या समारंभाचे प्रक्षेपण कलापिनीच्या फेसबुक पेज वर लाईव्ह पद्धतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचा आस्वाद जगभरातील सुमारे बारा हजार चारशे रसिकांनी घेतला

या प्रसंगी कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, विनायक भालेराव, खजिनदार श्रीशैल गद्रे, सचिव हेमंत झेंडे कलापिनीचे विश्वस्त प्रभाकर तुंगार, नयना तुंगार, कलापिनीचे ज्येष्ठ सदस्य नागेश धोपावकर, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, मास्क पॉलीमर्सच्या वतीने औद्योगिक सल्लागार यशवंत पाटील, प्रमोद शुक्ला व संदीप संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.

कलापिनीचे विश्वस्त प्रभाकर तुंगार, ज्येष्ठ विचारवंत प्रा. शिरीष अवधानी व कलापिनीचे नेपथ्यकार बाळासाहेब लोहोकरे यांना कलापिनी वर्षांत 2020 कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व मंगेश शिंदे (नृत्य),स्वप्नील जगताप(छायाचित्रण व गिर्यारोहण) ) व वासिम शेख (शरीर सौष्टव) यांना तळेगाव सितारा 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारार्थिनी पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल कलापिनी व कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानला धन्यवाद दिले व या पुरस्कारने जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे नमूद केले. या प्रसंगी कलापिनी 2021 च्या कलादर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कलादर्शिकेच्या दशकपुर्तीनिमित्त कालादार्शिकेचे मुद्रक सचिन देशमुख याचा गौरव करण्यात आला.

इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबच्या मुला मुलींनी योग प्रात्यक्षिके, नादब्रम्ह संगीत अ‍ॅकेडमी यांनी गायन सादर केले. कलाकीर्ती नृत्यालय, संचय कथ्थक अकादमी, निगडी, उत्सव डान्स ग्रुप, अंकित डान्स क्रिएशन, मुद्रा कथक विद्यालय, जी.बी.पी.पी.डी. डान्स अ‍ॅकेडमी पुणे, डान्स मनिया यांच्या दिलखेचक नृत्यांनी रसिकांची मने जिंकली. सचिन इंगळे आणि अजय शिंदे यांची ढोलकी आणि मृदुंगाची जुगल बंदी ताल यात्रेतून बहारदार पणे सादर करण्यात आली प्रदीप जोशी हार्मोनियम विद्यालय यांनी गण सादर केला, प्रसाद सिंदगी यांच्या माउथ ऑर्गनने मजा आणली.

डान्स मॅनिया यांच्या लक्ष्मी या चित्रपटातील दिमाखदार दिलखेचक नृत्याने कार्यकमाची सांगता झाली. या महोत्सवात 350 कलाकारांचा सहभाग होता. मास्क पॉलीमर्सचे राजेश मस्के, राजश्री मस्के यांनी या कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य केले होते.

या महोत्सवाचे सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर, डॉ. अनंत परांजपे, श्रीधर कुलकर्णी, डॉ.सावनी परगी, सायली रौंधळ यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली..

कलापिनीचे सचिव हेमंत झेंडे यांनी आभार मानले या सुंदर कार्यक्रमाची तांत्रिक बाजू, सुमेर नंदेश्वर, शार्दुल गद्रे, हनुमंत शिंदे यांनी सांभाळली होती. कार्यक्रम प्रमुख आदित्य धामणकर, चेतन पंडित, हरीश पाटील, अनिरुद्ध जोशी, रश्मी पांढरे, ज्योती ढमाले, मधुवंती रानडे, प्रतिक मेहता, श्रीपाद बुरसे, रामभाऊ रानडे, दीपक जयवंत, अशोक बकरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.