Pimpri News: प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची सोमवारपासून तपासणी

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पातील सदनिकांच्या ऑनलाईन संगणकीय सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी मोहिम सोमवार (दि.8) पासून सुरु करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

या सोडतीमध्ये विजेता झालेल्या लाभार्थ्यांनी मूळ (Original) कागदपत्रे म्हणजेच उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवाशी दाखला, भाडे करारनामा इ. व नियमानुसार इतर आवश्यक कागदपत्रांची मागणी महापालिकेने केल्यास लाभार्थ्यांना ते सादर करावे लागतील.

तसेच लाभार्थ्यांनी अर्जासोबत सादर केलेला उत्पन्नाचा दाखला याची तपासणी होणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची महापालिका हद्दीत कोणतीही मिळकत नाही, याची देखील तपासणी होणे आवश्यक राहील. ज्या राखीव प्रवर्ग मध्ये अर्जदार यांनी अर्ज सादर केला आहे. त्या प्रवर्गाच्या जात प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येईल.

या मूळ निकषाची पुर्तता झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. निकष पुर्तता झाली नसल्यास त्या लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येऊन त्या जागेवर प्रतिक्षा यादीतील प्रवर्ग निहाय लाभार्थ्यांस योजनेत समावून घेण्यात येणार आहे.

जागतिक महामारी कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे आरक्षणनिहाय नियोजन करुन लाभार्थ्यांना कागदपत्रांची तपासणी करण्याकामी बोलविण्यात येणार आहे. रावेत प्रकल्पासाठी 934 लाभार्थ्यांची निवड झालेली असून त्यांनी दिलेल्या वेळेनुसार कागदपत्रे तपासणीकामी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात उपस्थित रहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.