Pimpri News : रेमडेसिवीर ‘नॉट अवेलेबल’ ; कंट्रोल रुमचा नंबर सतत व्यस्त, रुग्णांचे हाल

एमपीसी न्यूज – कोरोना बाधीत रूग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या भासत आहे. रुग्णालयांनीच रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. परंतु, अनेक खासगी हॉस्पिटलला इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. तसेच, रेमडेसिवीरसाठी स्थापन केलेल्या कंट्रोल रूमचा देखील नंबर सतत व्यस्त लागत असून, औषधाविना रुग्णांचे हाल होत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना केसेस मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या, तसा रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यातूनच पुढे या इंजेक्शनचा काळाबाजार देखील होऊ लागला. यावर उपाय म्हणून रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूम स्थापन करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले.

कंट्रोल रूम स्थापन झाली त्याचे नंबरही सार्वजनिक करण्यात आले पण, त्यापैकी 1077 हा टोल फ्री क्रमांक साता-याचा आहे. तर, पुण्यासाठीचा 020- 2612 3371 हा क्रमांक सतत व्यस्त लागत आहे.

रुग्णालयांनीच रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. परंतु, अनेक खासगी हॉस्पिटलला इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. काळ्या बाजारात रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री केली जात असून, एक इंजेक्शन 15 ते 16 हजार रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे आर्थिक लूट तर होत आहेच शिवाय वेळेवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही.

पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे. अशात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने एक प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तसेच, शासन उपाययोजना तोकडी पडत असल्याचे चित्र आहे.

वैयक्तिक अनुभव सांगायचा तर मागील दोन दिवसांत चार ते पाच मित्रांनी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल का यासाठी फोन केला. कंट्रोल रूमचे फोन लागत नाहीत. खासगी औषधालयात विक्री बंद असल्याने तो पर्याय उपलब्ध नाही.

खासगी रुग्णालयांसाठी रेमडेसिवीर उपलब्ध होत नाही ही मोठी समस्या आहे. ऐनवेळी आवश्यकता भासल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.