Pimpri News : डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फल्यूबाबत तातडीने उपाययोजना करा : महापौरांच्या सूचना

एमपीसी न्यूज – सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला असून ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे तसेच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू आदी साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. या कामात दुर्लक्ष व विलंब करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी दिल्या.

या संदर्भात आयुक्त दालनात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत तातडीने झालेल्या आढावा बैठकीवेळी त्या बोलत होत्या. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आदी उपस्थित होते.

शहरामधील विविध भागामध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. सद्या शहरातील नागरीक कोरोना रुग्ण कमी होत असल्याने भयमुक्त होत असताना डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू सदृश्य रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण होवू शकते. सध्या पावसाळा सुरु असल्याने शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठत आहे. तसेच शहरातील नाल्यांमध्ये राडारोडा कचरा प्लॅस्टीक अडकून पडल्यामुळे नालेसुध्दा तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे.

शहरात लोकवस्तीच्या ठिकाणी असणाऱ्या टायरच्या दुकानातील जुन्या टायरमध्ये पाणी साठते तसेच घरांच्या आजुबाजूला असणाऱ्या कुंड्या, जुनी प्लास्टिकची भांडी, आदी वस्तूं मध्ये पाणी साठून राहून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात डेंग्यु डासांची उत्पत्ती होते.

यावर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने धुराडे फवारणी ( फॉगिंग ), औषध फवारणी, डबक्यांमध्ये ऑईल टाकणे, गप्पी मासे सोडणे, कोरडा दिवस पाळणे आदी उपाय योजना होताना दिसत नाहीत. ही बाब आरोग्य विभागाने लक्षात घेणे गरजेची असून याविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.

डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू इ. आजारांचा फैलाव रोखण्यासाठी वरीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करा तसेच कार्यवाही करण्यास विलंब अथवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशाही सूचना महापौर ढोरे यांनी आढावा बैठकीत दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.