Chikhali Crime News : कोयता दाखवत सोशल मीडियावर व्हिडीओ टाकणाऱ्या ‘त्या’ भाईची पोलोसांनी काढली धिंड (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – पैलवानी आवेशात मांडी ठोकून ‘आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात’ असे म्हणत कोयता हातात घेऊन व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या स्वयंघोषित भाईला गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 15) पोलिसांनी बेड्या ठोकून त्याची धिंड काढली.

मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय 21, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी) असे आरोपीचे नाव आहे.

मयूर याने सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यामध्ये त्याने कोयता दाखवून दहशत निर्माण केली होती. तर तिसऱ्या पोस्टमध्ये त्याने ‘आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात’, असे म्हणत थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते.

याबाबत गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढली आणि त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर याच्यावर यापूर्वी गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान पोलिसांनी तपासाकरिता आरोपी सरोदे याला  तो राहत असलेल्या दुर्गानगर परिसरातून हातात बेड्या घालून फिरविले. आरोपी सरोदे याची परिसरात दहशत असल्याने नागरिक घरातून पडद्याआडून त्याची पोलिसांनी काढलेली ही धिंड पाहात होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.