Pimpri News: इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्यांना तिकीट; केवळ सत्तेसाठी राष्ट्रवादीत येणाऱ्याला थारा नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज – भाजपमध्ये गेलेली मंडळी अस्वस्थ आहेत. इकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. हिंदीमध्ये म्हणतात ‘सुबह का भुला अगर शाम को घर लौट आया’. तर त्याचा विचार आपण करुया, पण, कोणी सत्तेसाठी येण्याकरिता प्रयत्न करत असेल. तर त्याला थाराही देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्यांना संधी दिली जाईल. त्यामुळे दादा पाच वर्षे आम्ही तुमच्याबरोबर होतो. हा काल आला आणि त्याला तिकीट दिले, असले काही मला सांगू नका, असेही ते म्हणाले.

पवार म्हणाले, मागच्या वेळी आपल्या पक्षातून अनेकजण तिकडे (भाजपमध्ये) गेले. तसे आता तिकडून पण आपल्या पक्षामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांचे इलेक्टिव्ह मेरिट असेल. त्यांनी यायचे ठरविले तर मी मागचे सगळे बाजूला सारुन त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जाण्याची मानसिकता ठेवली आहे. त्यामुळे दादा पाच वर्षे आम्ही तुमच्याबरोबर होतो. हा काल आला आणि त्याला तिकीट का दिले, असले काही मला सांगू नका, शेवटी निवडून येणे तितकेच महत्वाचे, इलेक्टिव्ह मेरिट त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे ही बाब आपण लक्षात घ्या. आत्तापासूनच प्रभागात कामाला सुरुवात करावी. शहराचा विकास हाच ध्यास ठेऊन सर्वांनी काम करावे.

तिकीटासाठी दिल्ली, मुंबई, पुणे वारी करू नका!

एकमेकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नका, शहानिशा करावी. तथ्य असल्याची खात्री पटल्याशिवाय भूमिका घेऊ नका, अॅक्टीव्ह रहावे. अंग झटकून कामाला लागा. निवडणुकीत काही नवे, अनुभवी, स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार देणार आहे. जागा आपल्या शहरातही वाढणार आहेत. पण, जास्त वाढणार नाहीत. त्यामुळे मलाच उमेदवारी द्या, असा आग्रह करू नका, तिकीटासाठी दिल्ली, मुंबई, पुणे वारी करु नका, प्रभागतच काम करत रहावे. इकडे-तिकडे वेळ वाया घालविण्यापेक्षा प्रभागातच राहून नागरिकांना पक्षासोबत जोडावे, अशा सूचना पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.