Pimpri : महिला बचत गटांच्या कौशल्य आणि कलागुणांना वाव देणारी पवनाथडी जत्रा

एमपीसी न्यूज – शहरी आणि ग्रामीण संस्कृतीने नटलेल्या तसेच पारंपारिक (Pimpri)  खेळांनी, सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि विविध आकर्षक, लोकपयोगी वस्तूंनी आणि चविष्ट खाद्यपदार्थांनी सजलेल्या पाच दिवसीय पवनाथडी जत्रेचा सोमवारी समारोप झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 16 वर्षांची परंपरा अबाधित ठेवत महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला बचत गटांनी जत्रेमध्ये सक्रीय सहभाग नोंदवत आपला स्टॉल लावून व्यवसाय केला आणि त्यातून लाखोंची उलाढाल केली. महिला बचत गटांच्या कौशल्य आणि कलागुणांना वाव देणारी पवनाथडी जत्रा खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये भर घालणारी ठरली.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे तसेच महाराष्ट्राच्या आणि सांस्कृतिक परंपरा आणि शहराच्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने 11 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवारी या पवनाथडी जत्रेचा समारोप झाला. या समारोप कार्यक्रमावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, उपआयुक्त अजय चारठाणकर, सहशहर अभियंता संजय खाबडे, सांगवी पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील तांबे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह महापालिका कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Lonavala : ठाकरे गटाचा लोणावळा येथे मेळावा संपन्न

महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना(Pimpri) महापालिकेच्या वतीने पवनाथडीच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये राज्यातील विविध विभागातून आलेल्या महिला बचत गटांनी विविध लोकपयोगी, शोभेच्या वस्तूंचा तसेच स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचा थाट मांडला होता.

यामध्ये मासे, मटन, चिकन, विविध प्रकारच्या बिर्याणी अशा विविध मांसाहारी तसेच पुरणपोळी, पुरण मांडा तसेच सुका मेव्यापासून बनवलेली विविध प्रकारची चिक्की, उकडीचे व विविध प्रकारचे मोदक, छोले मटार करंजी, खोबर करंजी, छोले भटुरे, दिल्ली चाट, गुजराती ढोकळा, फाफडा, दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ, महाराष्ट्रीयन झुणका भाकरी, थालीपीठ, मेथी धपाटे अशा शाकाहारी पदार्थांचा समावेश होता. तसेच ऑर्केस्ट्रा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा, वाघ्या-मुरळींची जुगलबंदी अशा अनेक लोककलांचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद रसिकांनी या पाचदिवसीय जत्रेमध्ये घेतला.

पवनाथडी जत्रेमध्ये सहभागी झालेल्या बचत गटांच्या महिला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, पवनाथडी जत्रा हा उपक्रम अतिशय वेगळा असून या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत मिळत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महिलांची गरज ओळखून आमच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महिलांना उत्तम व्यासपीठ तसेच आम्ही उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

नागरिकांनीही आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला ज्यामुळे आमच्या इच्छाशक्तींना अधिकच बळ मिळाले. शहरातील महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणात पवनाथडी जत्रेचा महत्वाचा वाटा आहे. या जत्रेमुळे आमचा आत्मविश्वास आणखी बळावला असून विपणनाचे नवनवीन मार्ग आमच्यासाठी खुले झाले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी यापुढेही असे विविध उपक्रम राबविले जातील आणि महापालिकेचे सहकार्य लाभेल अशी आशा आहे.

या कार्यक्रमात महिला बचतगटांच्या तसेच दिव्यांग आणि तृतीयपंथी बचत गटांच्या प्रतिनिधींचा पवनाथडी जत्रेत त्यांनी केलेल्या विशेष कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सारथी ऍपच्या माध्यमातून लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये दापोडी येथील रहिवासी अमोल जाधव हे विजेते ठरले. यावेळी त्यांना नाशिक फाटा येथील महालक्ष्मी सायकल्स यांच्या वतीने सायकल भेट देण्यात आली.

महिला बचत गटांनी घेतलेल्या सहभागाबद्दल आणि पवनाथडी जत्रेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व शासकीय, अशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मंडळे, सामाजिक संस्थांचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी आभार मानले.

समारोपीय कार्यक्रमाच्या शेवटी मराठी आणि हिंदी गीतांचा नजराणा ‘कारवाँ गीतोंका’ हा बदारदार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पवनाथडी जत्रेत सहभागी झालेल्या 850 पेक्षा जास्त महिला बचत गटांना तसेच जत्रेमध्ये सहकार्य करणाऱ्या महापालिकेच्या विविध विभागांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात (Pimpri) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.