Pimpri : अग्निशामक विभागाच्या ‘एनओसी’तून महापालिकेला 74 कोटी रुपयांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला सन 2018-19 या आर्थिक वर्षात अग्निशामक विभागाचे ना-हरकत दाखला (एनओसी), अन्य सुविधातून 74 कोटी 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अंदाजपत्रकात 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापेक्षा 148 टक्के अधिक वसूली झाली असल्याचे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले. तसेच हा सर्व भरणा ऑनलाईन झाला असून महापालिकेचा संपूर्ण ऑनलाईन भरणा होणार अग्निशामक एकमेव विभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्थिक वर्ष आज (रविवारी) संपत आहे.

यावेळी अग्निशामक विभागाचे प्रमुख किरण गावडे उपस्थित होते. महापालिकेच्या अग्निशामक विभागातर्फे इमारती, व्यापा-यांसाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. त्याचबरोबर विविध सुविधा देखील पुरविल्या जातात. त्या मोबदल्यात महापालिकेतर्फे शुल्क आकारले जाते. या विभागाला 2018-19 या आर्थिक 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ठ होते. विभागाने 74 कोटी 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. उद्दिष्ठापेक्षा 148 टक्के अधिक वसूली केली आहे. गेल्या आठ वर्षापेक्षा यावर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर पडल्याचे गावडे यांनी सांगितले.

नवीन 2019-20 या आर्थिक वर्षात महापालिकेतर्फे चोविसावाडी, मोशी, पिंपरी, गांधीनगर, थेरगावातील ‘ग’ प्रभागाच्या बाजूला आणि एमआडीसीतील एफ टू ब्लॉक अशा पाच ठिकाणी नवीन अग्निशामक केंद्र बांधण्याचे नियोजीत आहे. त्याची प्रक्रिया सुरु असून त्यासाठी या निधीचा उपयोग होईल, असे अग्निशामक विभागाचे प्रमुख किरण गावडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.