Pimpri: लॉकडाऊन इफेक्ट! दररोज कचरा संकलनात तब्बल 350 टनाने घट

एमपीसी न्यूज – एकीकडे कोरोनामुळे मोठे  संकट ओढवले आहे. तर,  दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासही हा व्हायरस कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन नंतरच्या काळात पिंपरी-चिंचवड  महापालिकेच्या कचरा डेपोवर नेहमीपेक्षा दररोज  तब्ब्ल 350  मेट्रिक टन कचरा कमी जमा होत आहे.  दरम्यान, पंधरा दिवसात दररोज 350 टन कच-याची घट झाल्याने महापालिकेचे दीड कोटी रुपये  वाचले आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात 22 मार्चपासूनच लॉकडाऊन आहे. कोरोनामुळे मोठे  संकट ओढवले आहे. तर, दुसरीकडे प्रदूषण कमी  होण्यासारखी चांगली  दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. कोरोनामुळे मानवनिर्मित कचराही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांकडून होणारे बाहेरचे सर्वच व्यवहार बंद असल्याने साहजिकच कचरा निर्मितीचे प्रमाणही कमी झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी दररोज साधारण 1050 ते 1150 टन कचरा महापालिकेच्या मोशीतील  कचरा डेपोवर जात होता.  लॉकडाऊन झाल्यापासून मात्र कचऱ्याचे हे प्रमाण कमी झाले आहे. आता दररोज 700 ते 822 टन कचरा जमा होत आहे. यामुळे कचरा संकलन तब्ब्ल 300 ते  350  टन घटले आहे .

गेल्या 15 दिवसांपासून हॉटेल, चायनीज टपऱ्या , इतर दुकाने बंद असल्याने शहरात ठिकठिकाणी ठेवलेल्या कचरा कुंड्या चक्क रिकाम्या आहेत. इतरवेळी  कुंड्या  कचऱ्याने ओसंडून वाहत असत; मात्र  लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व  व्यवहार बंद असल्याने कचरा कुंड्या रिकाम्या आहेत. लॉकडाऊन नंतरच्या काळात कचरा संकलनाबाबत नागरिकासह नगरसेवकांच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांची  डोकेदुखी कमी झाल्याचे दिसते.

 

महापालिकेची दीड कोटींची बचत

आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले की, महापालिकेने कचरा संकलनाचे काम खासगी ठेकेदाराला दिले आहे. टनाप्रमाणे ठेकेदाराला मोबदला दिला जातो.  शहरातून दररोज 1050 ते 1150 मेट्रिक टन कचरा निघत होता. तो ठेकेदाराकडून  उचलण्यात येतो. टनाप्रमाणे ठेकेदाराला 1700 रुपये दिले जातात. शहरातील कचरा उचलण्यासाठी दररोज साधारण पाच लाख खर्च येतो. या सरासरीने गेल्या पंधरा दिवसात दररोज 350 टन कच-याची घट झाल्याने महापालिकेचे दीड कोटी रुपये  वाचले आहेत.  शहरात रस्त्यावर केवळ  झाडांचा पालापाचोळा दिसत आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.