Pimpri: खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव आजपासून ‘सील’

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – कोरोनाच वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने कठोर पाऊली उचलली आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर आज (बुधवार) मध्यरात्री पासून सील केला आहे. पुढील आदेशापर्यंत हा भाग सील करण्यात आला आहे.

सील करण्यात आलेला भाग!

#घरकुल रेसीडेन्सी – बिल्डींग क्र.ए 1 ते 20 चिखली, (पवार इंडीस्ट्रीयल परीसर-नेवाळे वस्ती)

#जामा मस्जिद, खराळवाडी या भोवतीचा परीसर, पिंपरी (गिरमे हॉस्पीटल-अग्रेसन लायब्ररी-क्रिश्ना ट्रेडर्स-चैताली पार्क हौसिंग सोसायटी-खराळआई गार्डन-ओम हॉस्पीटल-ओरीयंटल बँक- सीटी प्राईड हॉटेल-क्रिस्टल कोर्ट हॉटेल-गिरमे हॉस्पीटल)

# कमलराज बालाजी रेसीडन्सी, रोडे हॉस्पीटल जवळ, दिघी, भोसरी (रोडे हॉस्पीटल-एसव्हीएस कॉम्प्युटर-स्वरा गिप्ट शॉपी-साई मंदीर रोड-अनुष्का ऑप्टीकल शॉप-रोडे हॉस्पीटल)

# शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव (शिरोळे क्लिनिक-गणेश मंदीर-निदान क्लिनिक-किर्ती मेडीकल-रेहमानिया मस्जिद-ऑर्कीड हॉस्पीटल-अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदीर ते शिरोळे क्लिनिक) हा परिसर सील करण्यात आला आहे.

या परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे.  सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा घरगुती स्वच्छ धुतलेला कापडी रुमाल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच आदेशामधील निर्बंधातून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याऱ्या व्यक्तींना, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी व वाहने व शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

यामुळे केला ‘हा’ परिसल सील!

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी-चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव  महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, शहरात रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील या भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यावर मर्यादा आणणे आवश्यक आहे.

‘महाराष्ट्र कोव्हीड 19′ उपाययोजना नियम 2020’ नुसार क्षेत्र प्रतिबंधित!

क्षेत्र प्रतिबंधित करणे,  क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधित करणे, क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करणे. तसेच भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 प्रमाणे संभाव्य होणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव आहे. याकरीता कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रण अधिनियम 1897  (एपिडमिक ऍक्ट) मधील तरतुदींनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील हा भाग सील केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.