Pimpri: दोन वर्षात प्राधिकरण 14 हजार घरे बांधणार; अध्यक्ष सदाशिव खाडे यांची घोषणा

सहा हजार घरांच्या कामाची वर्क ऑर्डर; बाजारभावा पेक्षा 50 टक्के कमी दराने घरे देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आगामी दोन वर्षांत सर्वसामा-यांना परवडतील अशी 14 हजार 665 घरे बांधणार आहे. त्यापैकी सहा हजार घरांच्या कामाची वर्क ऑर्डर देखील दिली आहे. गोरगरिबांना बाजारभावापेक्षा 50 टक्के कमी दराने घरे दिली जाणार आहेत, अशी घोषणा प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी आज (शनिवारी) केली. तसेच प्राधिकरण झोपडपट्टी मुक्त करणार असून साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न देखील मार्गी लावणार आहे. डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृहप्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निगडीतील, प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके उपस्थित होते. ‘घरे बांधण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना झाली. परंतु, स्थापनेपासून आजपर्यंत प्राधिकरणाने केवळ 11 हजार 500 घरे बांधून वाटली’ असल्याचे सांगत खाडे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2020 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा नारा आहे. त्या दृष्टीने बेघरांना हक्काचे घर देण्याचे आम्ही ठरवले आहे. आगामी दोन वर्षात 14 हजार 665 घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी सेक्टर क्रमांक 12 येथे बांधण्यात येणा-या चार हजार 883 घरांच्या कामाची कार्यरंभ(वर्कऑर्डर)आदेश देखील दिला आहे”

पेठ क्र. 30-32 मध्ये (इडब्ल्यूएस) 792 सदनिका, पेठ क्र. 6 (एमआयजी) 124 सदनिका, पेठ क्र. 6 (इडब्ल्यूएस) 260 सदनिका, पेठ क्र. 6 रोहाऊस 17, पेठ क्र. 1 (इडब्ल्यूएस) 105 सदनिका, पेठ क्र. 1 (एलआयजी, एचआयजी) 222 सदनिका, पेठ क्र. 1 (इडब्ल्यूएस) 400 सदनिका, पेठ क्र. 4 (इडब्ल्यूएस) 105 सदनिका, पेठ क्र. 7 (इडब्ल्यूएस) 400 सदनिका, पेठ क्र. 29 (एलआयजी, इडब्ल्यूएस) 312 सदनिका, पेठ क्र. 29 शिंदे वस्तीजवळ (एलआयजी) 270 सदनिका, पेठ क्र. 32अ, शिंदेवस्तीजवळ (एलआयजी) 600 सदनिका, पेठ क्र. 32अ राखीव जागा (एलआयजी, एमआयजी) 800 सदनिका बांधण्याचे नियोजन आहे, अशीही माहिती खाडे यांनी दिली. प्राधिकरणाच्या स्थापनेपासून जेवढी घरे बांधली आहेत. त्यापेक्षा जास्त घरे बांधून जुना विक्रम मोडणार आहे’.

“बिल्डरधार्जिणे धोरण न आखता सर्वसामान्यांच्या हिताचे धोरण राबविले जाणार आहे. बाजारभावपेक्षा 50 टक्के घराची किंमत असणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 300 चौरस फुट आणि निम्न उत्पन गटासाठी 600 चौरस फुट असे घर अंदाजे साडेअकरा ते बारा लाख रुपयांपर्यंत देण्याचे विचाराधीन आहे. 30 स्क्वेअर फुटाचे घर अंदाजे साडेअकरा ते बारा लाख रुपयांपर्यंत देण्याचे विचाराधीन आहे. घरांची किंमत लवकरच निश्चित केली जाईल. त्याचबरोबर वाल्हेकरवाडी येथील 792 घरांच्या सुरु असलेल्या प्रकल्पाचे काम वेगात सुरु केले आहे. त्याच्या 53 विंग पूर्ण झाल्या आहेत” असेही खाडे यांनी सांगितले.

‘प्राधिकरणाच्या हद्दीत नऊ झोपडपट्या आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून घरे बांधून देऊन प्राधिकरण झोपडपट्टी मुक्त करणार असल्याचे सांगत खाडे म्हणाले,” प्राधिकरणाच्या हद्दीतील 30 हजार अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहेत. त्यासाठी रेडीरेकनर दर कमी केला जाईल. प्राधिकरणासाठी जमिनी संपादित केलेल्या भूमिपुत्रांच्या साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न देखील समन्वयाने मार्गी लावला जाईल. त्याबाबतचे धोरण आम्ही निश्चित करत आहोत. 1984 नंतर जमीन संपादित केलेल्या शेतक-यांना 109 हेक्टरचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी केवळ 83 लाभार्थी राहिले आहेत. त्यांच्या वंशवळ, वारस अशा अडचणी आहेत. त्यामुळे ते रखडले आहेत. प्राधिकरणामुळे तो प्रश्न रखडला नाही”, असेही ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके म्हणाले,”प्राधिकरणाच्या ताब्यात साडेअकराशे एकर जागा आहे. त्यापैकी 31 एकर जागा विकसित केली आहे. 250 एकर जमिनीवर 30 हजार अनधिकृत बांधकामे झाली आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आजपर्यंत केवळ 65 अर्ज प्राप्त झाले आहेत. रिंगरोडमध्ये केवळ 600 ते 700 घरे जात आहेत. विकास आराखडा बनिवण्याचे काम सुरु असून नागरिकांच्या तक्रारी त्यांना दिल्या आहेत. प्राधिकरणाने यापूर्वी भूखंडाची विक्री केली आहे. रहिवाशी, औद्योगिक भूखंडाबाबतचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर विक्रीचे नियोजन केले जाणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.