Pimpri : पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच जनावरांना जीवनदान; सात जणांवर गुन्हा

Police vigilance kills five animals; Crime on seven people :पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल करून मांसाची विक्री केली जात होती

एमपीसी न्यूज – पोलिसांनी सतर्कता दाखवत जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी पाच जनावरांची सुटका केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरात कठोर टाळेबंदीची घोषणा करण्यात आलेली असताना हा प्रकार सुरू होता. याबाबत पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शाकिर मजीद पठाण (वय 35, रा. खडकी बाजार, पुणे), सुनील मनोहर सरवदे (वय 32), शहनवाज कुरेशी (वय 22), गौस मुजीब कुरेशी (वय 26), सुभान वजीर कुरेशी (वय 23), शाबीर मंजूर कुरेशी, युसूफ रज्जाक कुरेशी (सर्व रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर अर्जुन चव्हाण यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस गस्त घालत असताना पिंपरी येथील इंदिरा गांधी पुलाखाली एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल करून मांसाची विक्री केली जात होती.

त्यानुसार पोलिसांनी पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता तिथे जनावरांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांची चाहूल लागताच काहीजण पळून गेले. तर पत्र्याच्या शेडमध्ये तिघेजण आढळून आले. एका गायीची कत्तल करण्यात आली होती.

तर दुसऱ्या गायीची कत्तल करण्यासाठी पाय बांधून झोपवण्यात आले होते. पोलिसांनी पाय बांधून कत्तलीसाठी झोपवलेल्या गायीची, तीन लहान जनावरे आणि एक बैल अशा एकूण पाच जनावरांची सुटका केली.

पोलिसांनी पाच जनावरे आणि दोन टेम्पो व इतर साहित्य असा एकूण 5 लाख 55 हजार 50 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी प्रसंगी धाव घेत जनावरांची सुटका केल्याने पाच जनावरांचा जीव वाचला आहे.

सुटका केलेल्या जनावरांना मावळ तालुक्यातील धामणे येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.