Pimpri : प्रा. सुलभा मोहिते यांना पीएच.डी.

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखांतर्गत दिली जाणारी कला विद्याशाखेची ‘पीएच.डी. (विद्यावाचस्पती) प्रा. सुलभा मोहिते यांना जाहीर झाली आहे. विद्यापीठाच्या ‘ज्येष्ठ नागरिक’ या वर्गामधून त्यांनी ‘मराठीतील संत कवयित्रींच्या अभंगातील संवादतत्व’ या विषयातील प्रबंध विद्यापीठास सादर केला आहे.

त्यांना पीएच.डी. प्रबंधासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोला येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव शेळके यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रा.सुलभा मोहिते यांची आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि जनता शिक्षण संस्था यांच्या दापोडी व औंध माध्यमिक विद्यालयात 36 वर्षांपेक्षा जास्त काळ अध्यापन सेवा झाली आहे. त्यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉरिशस, मॉस्को, दुबई इत्यादी ठिकाणी शोधनिबंध सादर केलेले आहेत. तसेच त्यांनी बालचित्रवाणी पुणे येथे नाट्यसंहितालेखन, पट्कथालेखन केले असून ‘वाणी’ या प्रकारात प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी अनेक वर्षे इयत्ता 11 वी व 12 वी परीक्षांचे ‘परीक्षक’, ‘परीक्षा नियामक’, एस.एस.सी., एच. एस.सी. अभ्यासक्रम पुनर्रचना, नाट्यस्पर्धांचे ‘परीक्षक’ म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.