Pimpri: खासदार अमर साबळे यांना ‘नारळ’; राज्यसभेतून पत्ता कट!

एमपीसी न्यूज – राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले तीनही उमेदवार जाहीर केले असून विद्यमान खासदार अमर साबळे यांना ‘नारळ’ दिला आहे. मागीलवेळी ‘लकी ड्रॉ’ लागलेल्या साबळे यांना यावेळी उमेदवारी अपेक्षित असताना उपेक्षित व्हावे लागले आहे. साबळे यांना साडेपाच वर्षांचा कार्यकाल मिळाला आहे.

राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपच्या विधानसभा सदस्यांच्या संख्याबळानुसार तीनच उमेदवार निवडून जावू शकतात. भाजपने आरपीआयचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी काल जाहीर केली होती. शेवटचा उमेदवार आज जाहीर केला असून औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना भाजपाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने साबळे यांना दणका देत त्यांचा पत्ता कट केला आहे.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची राज्यात सत्ता आली. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभा खासदार मुरली देवरा यांचे 2015 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अनपेक्षितपणे अमर साबळे यांनी उमेदवारी मिळाली होती. विधानसभेत भाजपचे बहुमत असल्याने 11 मार्च 2015 रोजी साबळे राज्यसभेत बिनविरोध निवडून गेले होते.

साबळे यांना राज्यसभेत साडेपाच वर्षांचा कार्यकाल मिळाला. भाजपने राज्यसभेत पक्षाचे प्रतोदपद देखील त्यांना दिले होते. परंतु, प्रतोपद मिळूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे साबळे यांना कामाची छाप पाडता आली नाही. त्यांचा विश्वास संपादित करता आला नाही. केंद्र, राज्यात भाजपची सत्ता असतानाही साबळे शहरासाठी एकही प्रकल्प आणू शकले नाहीत.

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातही म्हणावा तसा प्रभाव टाकता आला नाही. शहराच्या राजकरणापासून ते फटकून राहत होते. मागीलवेळी ‘लकी ड्रॉ’ लागलेले साबळे यांना यावेळी उमेदवारी मिळेल असे अपेक्षित असताना उपेक्षित व्हावे लागले आहे.

दरम्यान, 2014 मध्ये राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपने शहरात तीन राज्यमंत्रीपद, राज्यसभा खासदारकी दिली. परंतु, 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकासआघाडीचे सरकार आले. त्याचा परिणाम शहर भाजपवर झाला.

सदाशिव खाडे यांचे प्राधिकरणाचे अध्यक्षपद गेले, अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांची लेखा समितीचे अध्यक्षपद गेले आणि आता अमर साबळे यांची खासदारकी गेली. अमित गोरखे यांचे देखील अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद जाण्याच्या मार्गावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.